सातारा : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. भाग्यश्री विजय बडे (मूळ रा. नांदगाव, ता. सातारा, सध्या रा. मुंबई) असे आरोपी महिलेचे नाव आहे.याबाबत प्रियंका राजेंद्र शिंदे (वय २५, रा. गोडोली) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भाग्यश्री बडे हिने एम्पॉईज स्टेट कॉर्पोरेशनमध्ये नोकरी लावते, असे आमिष दाखवले होते. त्या बदल्यात शिंदे यांनी बडे हिच्या खात्यावर कोरेगाव व सातारा येथील बँकेच्या शाखेतून वेळोवेळी १ लाख १४ हजार ५०० रुपये जमा केले.
गेल्या आठ महिन्यांपासून नोकरी न लावल्याने शिंदे यांनी पैसे परत मागितले. त्यावर भाग्यश्री बडे हिने खात्यात पैसे नसताना चेक दिला. तो शिंदे यांनी भरला; परंतु तो वटला नाही.
त्यानंतर नोकरी व पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर प्रियंका शिंदे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पोरे तपास करीत आहेत.