वाई (सातारा) : वाई तालुक्यातील वसवली येथील वनखात्याच्या राखीव जागेत वणवा लावल्याप्रकरणी न्यायालयाने एका महिलेला तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, नागरिक गैरसमजातून दरवर्षी डोंगर तसेच पडीक क्षेत्रात वणवे लावत असतात. वणवे लावल्याने वनसंपदेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. यामध्ये तानुबाई गोविंद वाशिवले (रा़. वाशिवली) यांनी दि़ २५ एप्रिल रोजी वाशिवली येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लावला होता़.
याविरोधात वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांच्या नेतृत्वाखाली वाई तालुक्यातील वाशिवली येथील आरोपींवर कडक कारवाई करून आरोपपत्र दाखल केले होते़ त्याचा निकाल लागून न्यायालयाने शिक्षा सुनावली.भारतीय वनअधिनय १९२७ चे २६ (१) ब (फ) अन्वये वन गुन्हे नोंद केले होते़ वाईचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश सुरेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक उत्रेश्वर ठोंबरे, वनपाल भाऊसाहेब कदम यांनी तपास करून तानुबाई वासिवले विरुद्ध दि़ १४ आॅगस्ट रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.न्यायालयात हजर केले असता तानुबाई वासवले यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर वणव्याबाबतचा गुन्हा कबूल केला़ याप्रकरणी न्यायालयाने तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली़.या कारवाईत साताºयाचे तत्कालीन उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनरक्षक विजय परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश झांजुर्णे, वनपरिक्षेत्र अधिकारी सदानंद राजपुरे, वनरक्षक प्रदीप जोशी, संदीप पवार यांनी कार्यवाहीत सहभाग घेतला़.