वडूज : वडूजनगरीचा विस्तार होत असताना कचरा निर्मूलन करताना नगरपंचायतीला अनंत अडचणी येत आहेत. हे वास्तव येरळा नदीच्या पात्रातील घाणीचे ढीग पाहिल्यानंतर स्पष्ट दिसून येते. याबाबत प्रशासन गंभीर असले तरी आजअखेर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जलद गतीने वाढत असलेल्या वडूज नगरीतील बसस्थानक परिसर, वाकेश्वर रस्ता आणि नव्याने व झपाट्याने वाढत असलेल्या पेडगाव रस्त्यालगत होणारे टुमदार बंगले या भागातील सांडपाणी व अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न गंभीर समस्यांनी जखडलेला आहे. तर सांडपाणी मोकळ्या जागेत सोडून परिसरात घाणीचे साम्राज्य होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वडूजनगरीची विराटनगरी होताना कोणताही नियोजन आराखडा तयार नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घंटागाडी वेळेवर येत असतानाही टाकाऊ कचरा काही प्रमाणांत येरळा नदीच्या पात्रात पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत.तालुक्याचे मुख्यालय असल्याने वडूजनगरीत दाट लोकवस्तीचे प्रमाण वाढत आहे. गावठाणात समावेश असलेल्या भागात गटार व्यवस्था आणि अंतर्गत रस्ते असल्याने काही प्रमाणात सुस्थिती आहे.
मात्र, सर्व शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुल व दवाखाने असल्यामुळे या नगरीलगत असणारे पेडगाव, वाकेश्वर, सातेवाडी, गणेशवाडी आणि सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावरील भागात दाट लोकवस्ती होत आहे.
रिकाम्या जागेतील सांडपाण्याची डबकी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. तर मोकळ्या जागेतून सोयीनुसार रस्ते काढल्याने काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवलेले पाहावयास मिळतात. विराटनगरीचा विस्तार झपाट्याने होत असलातरी हे सांडपाणी व स्वंयघोषित रस्ते पुढील पिढीस घातक ठरणार, यात तीळमात्र शंका नाही.मुख्य गावठाणातील सांडपाणी येरळा नदीतच येत असल्याने पात्रात साचणारे पाणी दूषित होऊन आरोग्यास घातक ठरत आहे. तेच पाणी येरळा तलावात जात असल्याने पिण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.