सातारा : मागील काही वर्षांपासून रखडलेली आणि सातारा जिल्हा परिषदेतील रिक्त तब्बल ९७२ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी २१ संवर्ग असून ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला आहे. या उमेदवारांनी तब्बल पावणे सात कोटी रुपये शुल्क भरलेले आहे.राज्यातील जिल्हा परिषदांतील नोकर भरती रखडली होती. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत होता. परिणामी नोकर भरती लवकर करावी यासाठी कर्मचारी संघटनांनी मागणी लावून धरली होती. त्यानंतर राज्य शासनाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांतील नोकर भरतीसाठी हिरवा कंदील दाखवला. त्यानुसार मागील दोन महिन्यांपासून नोकर भरतीबाबत प्रक्रिया सुरू झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेतीलही विविध २१ संवर्गा अंतर्गत भरती होत आहे.राज्य शासनाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदाच्या भरतीबाबत सूचना केली आहे. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. सातारा जिल्हा परिषदेतीलही तब्बल ९७२ जागांची भरती होत आहे. या भरतीसाठी ३१ मार्च २०२४ ची संभाव्य रिक्त पदे ग्राह्य धरण्यात आलेली आहेत. तर एकूण २१ संवर्गाचा भरतीत समावेश आहे. शासनस्तरावरुन करण्यात आलेल्या सूचनेनुसार ही भरती योग्य पदातून १० टक्के ग्रामपंचायत कर्मचारी आणि २० टक्के अनुकंपा पदे वगळून ९७२ पदांसाठी होत आहे. ही भरती प्रक्रिया वर्ग तीन कर्मचाऱ्यांसाठी होत आहे. तर याबाबत मागील शनिवारपासून परीक्षाही सुरू झालेली आहे.या नोकर भरती परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात आले आहे. उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांना शुल्क भरणे अनिवार्य होते. यासाठी सातारा जिल्हा परिषदेतील नोकर भरतीसाठी ६ कोटी ७३ लाख ९८ हजार ८०० रुपयांचे परीक्षा शुल्क भरण्यात आलेले आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला एक हजार रुपये शुल्क होते. तर आरक्षित जागेवरील उमेदवारांसाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात आलेले. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेतील भरतीसाठी ७४ हजारांवर उमेदवारांनी अर्ज केलेला. त्यामुळे शुल्कापोटी जवळपास पावणे सात कोटी रुपये शासनाकडे जमा झालेले आहेत.
आरोग्य विभागात ६३५ जागा...सातारा जिल्हा परिषदेतील नोकर भरतीत वर्ग तीनच्या ९७२ जागा भरण्यात येणार आहेत. यामधील तब्बल ६३५ जागा या आरोग्य विभागाच्या आहेत. यामध्ये आरोग्य सेवक महिलांच्या तब्बल ३५३ जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमुळे आरोग्य विभागाला मोठे मनुष्यबळ उपलब्ध होणार असून रुग्णांवर उपचार करण्यासाठीही फायदा होणार आहे.