लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली आहे. नागराजन या मंगळवारीच पदभार स्वीकारणार आहेत. तर यामुळे जिल्हा परिषदेला प्रथमच महिला आएएस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे. नगाराजन या आता ३६ व्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी ज्ञानेश्वर खिलारी यांची सवा वर्षापूर्वी नियुक्ती झाली होती. त्यांनी सर्व विभागात समन्वय ठेवून कामे केली. घरकुल तसेच शिक्षण, आरोग्य विभागातील अनेक विषय मार्गी लावले. आता त्यांची बदली पुणे येथे इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागात झाली आहे. खिलारी यांच्या जागी याशनी नागराजन यांची नियुक्ती झाली. नागराजन या २०२० च्या आएएस अधिकारी आहेत. सध्या त्या यवतमाळ जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तसेच पांढरकवडा येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी होत्या. तेथून त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्या सातारच्या ३६ व्या तसेच पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्या आहेत. मंगळवारी त्या पदभार घेणार आहेत. त्या तमिळनाडू राज्यातील आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय रिझर्व बॅंक तसेच विदेशन मंत्रालयातही काम केले आहे.
सातारा जिल्ह्यात काम करण्यासारखे खूप आहे. कृषी क्षेत्रातही काम करण्यासाठी वाव आहे. मिळणाऱ्या कार्यकालात लोकांची कामे मार्गी लावण्याला प्राधान्य असेल. त्याचबरोबर महिला आणि शाळा या विषयीही अधिक कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.- याशनी नागराजन, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी