सातारा : किल्ले प्रतापगडावर शिवजयंतीला जाण्याची मागील अनेक वर्षांची परंपरा सातारा जिल्हा परिषदेने जपली असून यावेळीही सर्व अधिकाऱ्यांनी किल्ल्यावर जाऊन श्री भवनीमातेची महापूजा केली. तसेच पालखी मिरवणुकीत सहभागी होत खांदाही दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्यांनी सर्व वातावरणात जोश भरुन राहिला होता.महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे सातारा जिल्ह्याचे नाव सर्वदूर पोहोचलेले आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचा कारभारही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारानेच चालतो. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे एक आदर्श म्हणून पाहिले जाते. याच जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवजयंतीसाठी किल्ले प्रतापगडावर जातात. तर १२ मार्चला यशवंतराव चव्हाण यांची जयंती असते. या दिवशीही अधिकारी-कर्मचारी कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करतात. ही परंपरा अनेक वर्षांची आहे. यामध्ये कधीही खंड पडलेला नाही. यावर्षी जिल्हा परिषदेवर प्रशासकराज असल्याने अधिकारीच किल्ले प्रतापगडावर गेले होते. त्यांच्या हस्ते आणि उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सोमवारी सकाळी ७ वाजता श्री भवानी मातेस मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. तसेच महापूजाही करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडे नऊला मंदिरासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी कुंभरोशीचे सरंपच, ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर पालखी मिरवणूक निघाली. मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी पालखीला खांदा दिला. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा देण्यात येत होत्या. तसेच प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचे पोवाडेही एेकविले जात होते. यामुळे सर्व वातावरणात जोश भरुन राहिला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ पालखी मिरवणूक गेली. त्यानंतर पूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मोहसीन मोदी, राहुल अहिरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे गाैरव चक्के, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम, जिल्हा कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. महेश खलिपे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी डाॅ. सपना घोळवे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अरुण दिलपाक, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी उपस्थित होते.
पोवाडा गायन अन् शिवचरित्रपर व्याख्यान..शिवजयंतीमुळे किल्ले प्रतापगडावरील सर्व वातावरण शिवमय झाले होते. सकाळपासूनच किल्ल्यावर पोवाडे सुरू होते. सर्वत्र पताका लावण्यात आल्या होत्या. यावेळी पोवाडा गायन, शिवचरित्रपर व्याखान तसेच शालेय विद्याऱ्श्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपली कला सादर केली. यादरम्यान, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताचे गायनही करण्यात आले.
ठराव समितीची सभाजिल्हा परिषदेत पदाधिकारी असताना किल्ले प्रतापगडावर स्थायी तसेच विविध समितींच्या सभा होत. पण, सध्या प्रशासकराज असल्याने ठराव समितीची सभा होत आहे. शिवजयंतीदिनीही किल्ल्यावर ठराव समितीची सभा होऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.