सातारा - बर्लिन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय शिलेदारांनी सोनेरी कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकून भारतीय तिरंदाजांनी जर्मनीच्या धरतीवर भारताचा गौरव केला. शुक्रवारी ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. या यशाबद्दल सर्वांचं देशभरातून कौतुक होत आहे. त्यात, मराठमोळ्या आणि सातारच्या कन्येचं खासदार उदयनराजे भोसलेंनी खास कौतुक केलंय.
महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय तिरंदाजांनी मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला. तर, शनिवारी अदितीने सोनेरी कामगिरी करत वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले. तिने अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले. तिचे हे यश देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही तिचं सोशल मीडियातून खास कौतुक केलंय.
''भारताच्या १७ वर्षीय आदिती स्वामी हिनं आज जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकाविलं. साताऱ्याच्या आदितीने मिळविलेले हे यश देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी कामगिरी ठरली आहे'', असं उदयनराजेंनी म्हटलंय. तसेच, ''आदितीनं ज्युनियर जगज्जेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत आज बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून विश्वविजेतेपद मिळविलं. अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीनं (१४९-१४७) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. बेकेरा दोन वेळा जगज्जेता राहिली आहे.
भारतीय संघानं नुकतेच पहिल्यांदाच कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. या पाठोपाठ आदिती स्वामीच्या यशामुळं देशाच्या पदक तक्त्यास चार चांद लागले आहेत. आदितीचं आणि तिच्या कुटुंबीयांचं अभिनंदन, असे म्हणत उदयनराजे अदितीवर कौतुकाचा वर्षाव केलाय.
९ व्या वर्षापासून सुरू असलेल्या मेहनतीचं फळ
वयाच्या नवव्या वर्षापासून सुरू केलेला संघर्ष आज फळ देत असल्याची भावना अदितीची आहे. १७ वर्षीय अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली. तिने महिलांच्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करून तिरंग्याची शान वाढवली. शुक्रवारी सांघिक आणि शनिवारी वैयक्तिक सुवर्ण जिंकून अदितीने तमाम भारतीयांच्या मनात जागा केली. अदिती ही मूळची सातारची असून तिची आई आंबवडी या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे, तर वडील पेशाने शिक्षक आहेत. तिला एक लहान भाऊ असून तो देखील आर्चरीमध्ये नशीब आजमावत आहे
सचिन तेंडुलकरकडूनही कौतुक
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचे कौतुक केले. जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी केली असल्याचे सचिनने म्हटले. तसेच महिला कम्पाऊंड संघातील खेळाडू (ज्योती, अदिती आणि परनीत) यांनी सांघिक कामगिरी करून सुवर्ण पदक जिंकले. अदितीने १७ व्या वर्षी वैयक्तिक विश्वविजेतेपद पटकावले आणि त्यानंतर ओजसने अचूक स्कोअर करून इतिहास रचला. बर्लिनमध्ये आमच्या तिरंदाजांनी भारताचा गौरव केला, अशा शब्दांत क्रिकेटच्या देवाने खेळाडूंच्या कामगिरीवर कौतुकाची थाप दिली.