सातारा : सातारा हिल हाफ मॅरेथॉनने जागतिक पातळीवर झेंडा रोवलेला असतानाच रविवारी यामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला. ‘हरित व स्वच्छ सातारा’चा संदेश देत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सातारकर चोवीस तास धावले. सातारा हिल मॅरेथॉन असोसिएशन ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन संस्था (एम्स)ची सदस्य आहे. ‘एम्स’तर्फे दरवर्षी ग्रीन मॅरेथॉन पुरस्कार दिला जातो. सातारा हिल हाफ मॅरेथॉनने आजवर दोन विक्रम प्रस्तापित केले आहेत. जागतिक दर्जाचा ग्रीन मॅरेथॉन पुरस्कार जिंकण्यासाठी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे. यंदाची हाफ मॅरेथॉन १७ सप्टेंबरला होत आहे. याला नऊ महिने शिल्लक असल्याने विविध उपक्रमांना सुरुवात केली. नवीन वर्षाचा पहिल्या दिवसाचे औचित्य साधून ‘सातारकर धावणार चोवीस तास’ हा उपक्रम राबविला.याचे उद्घाटन पोवई नाक्यावर सकाळी आठ वाजता पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते ध्वज उंचावून करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे, कमलेश पिसाळ, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. देवदत्त देव, डॉ. सुचित्रा काटे, डॉ. रंजिता गोळे, डॉ. अश्विनी देव, डॉ. पल्लवी पिसाळ उपस्थित होत्या.या मोहिमेत सुमारे दीड हजार सातारकरांनी नावनोंदणी केली होती. त्यातील सुमारे चारशे सातारकर सकाळी हिरवा टी शर्ट, टोपी अन् झेंडा घेऊन शहरातून धावले. यावेळी राधिका रोडवर असलेला कचरा आयोजक व धावपटूंना हटविला. त्यानंतर शहरातील ठिकठिकाणचा कचरा नियमित हटविला जाईल, असा संकल्प करण्यात आला. (प्रतिनिधी)पोलिस अधीक्षकांची दौडमोहिमेचे उद्घाटन सकाळी आठ वाजता पोवई नाक्यापासून करण्यात आले. निळ्या रंगाचा ट्रॅकशूट व शूज घालून आलेले पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी याचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी स्वत:च धावण्यास सुरुवात केली. पाटील हे सुमारे दीड तास धावत होते. त्यांनी पोवई नाक्यापासून राजवाडा, मंगळवार तळे. त्यानंतर पुन्हा राजवाडा, मोती चौक मार्गे पोवई नाका धावले. शहरात तासाला दहा मार्ग साताऱ्यातून रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ असे चोवीस तास धावणार असल्याने शहरातील वाहतुकीचा विचार करून मार्ग ठरविले. प्रत्येक मार्ग सरासरी आठ ते दहा किलोमीटरचा होता. यामध्ये दर तासाला एका मार्गावरून सातारकर धावत होते. प्रत्येक मार्ग पोवई नाक्याला जोडला जात होता. त्यामुळे अनेकांनी ते राहत असलेला परिसर, वेळ याचा विचार करून धावले. महिलांचाही पुढाकारसातारा हिल मॅरेथॉनमध्ये दरवर्षी शेकडो सातारकर धावत असतात. यामध्ये सर्वच वयोगटातील नागरिकांचा सहभाग असतो. हरित सातारा सर्वांनाच हवा आहे. त्यामुळे रविवारच्या या मोहिमेत महिलांनीही उत्साहाने सहभाग घेतला. शहरातील रस्त्यांवरुन महिला, तरुणी लहान मुलं धावताना दिसत होते. त्यामुळे अनेकांनी उत्स्फूर्तपणे धावणे पसंत केले. सौर टोप्यांचं खास आकर्षणसातारकर चोवीस तास धावणार असल्याने रात्रीच्या अंधारावरही त्यांनीच मात केली आहे. दिवसभर धावत असलेल्या धावपटूंच्या टोप्यांना सौरऊर्जा यंत्रणा बसविली होती. या टोप्या दिवसभर सूर्यप्रकाशामुळे चार्ज झाल्या. त्यामुळे त्याच टोप्याचे दिवे रात्री प्रज्वलित झाले. या टोप्यांचे खास आकर्षण होते.
पर्यावरणासाठी सातारकर धावले चोवीस तास !
By admin | Published: January 01, 2017 10:46 PM