स्टार ८६०
हौसेला मोल नाही; शासनाच्या तिजोरीत दरवर्षी कोट्यवधींचा महसूल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारकर अनेक गोष्टींमध्ये सर्वात पुढे आहेत. देशाचे रक्षण असो अथवा कुठली हाैस करायची म्हटली तरी सातारकरांना पैशाचे मोल राहत नाही. वाहनांच्या क्रमांकाबाबतदेखील पसंती क्रमांक घेतला जातो. पसंती क्रमांकाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तिजोरीत तब्बल ३ कोटी ९९ लाख ७७ हजार रुपयांचा महसूल जमा झाला.
१ या वाहन क्रमांकासाठी वाहनचालकांनी तब्बल साडेचार लाख रुपये मोजले आहेत. लाखांची गाडी तर नंबर देखील लाखांचा असावा, असे अनेकांना वाटते. या भावनेतूनच लोक वाहनांचे क्रमांक घेताना त्यासाठी पैसे मोजतात. साताऱ्यातील बहुतांश नेत्यांचे वाहनांचे नंबर्स हे आकर्षक असे आहेत. त्यांची वाहने आल्यानंतर वाहन कोणाचे हे लगेच लक्षातदेखील येते, तोच कित्ता त्यांचे कार्यकर्तेदेखील गिरवतात. अगदी छोटी गाडी घेतली तरी तिला चॉइस नंबर हवा अशी भावना त्यामागे असते.
जो क्रमांक पसंतीच्या यादीत नाही परंतु विशिष्ट क्रमांकासाठी ४ हजार १६१ लोकांनी हातभार लावत यासाठी तब्बल ३ कोटी ९९ लाख ३३ हजार ५०४ रुपये मोजलेले आहेत. वाढदिवस, कुटुंबातील मुलगा, मुलगी, पत्नी किंवा आई-वडील यांचा जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस असेल तर तो क्रमांक वाहनाचा क्रमांक घेतला आहे. काहींनी देवाचे किंवा कूळ समाजाला यातून अधोरेखित केलेले आहे. आमदार, खासदार, उद्योजक, सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद सदस्य यांनादेखील हा मोह आवरता आलेला नाही. बहुतांशी नेत्यांच्या वाहनांना त्यामुळेच आकर्षक नंबर आहेत.
...तर नंबरसाठी होतो लिलाव
१. आरटीओच्या माध्यमातून बंद पाकिटात इच्छुकांकडून अर्ज मागविले जातात. त्यानंतर तारीख निश्चित करून सर्व अर्ज अर्जदाराच्या समोरच पाकीट उघडले जाते.
२. ज्या व्यक्तीने सर्वाधिक रक्कम भरली असेल तर त्या व्यक्तीला हा नंबर दिला जातो. त्या दिवशी एखादा क्रमांक चारचाकीचा शिल्लक नसेल तर तो क्रमांक दुचाकीलाही देता येतो मात्र त्यासाठी जास्तीचे शुल्क आकारले जाते.
३. जर एका नंबरसाठी एकापेक्षा अधिक लोकांनी अर्ज केला असल्यास त्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवली जाते, त्या लिलावातून तो सर्वाधिक बोली बोलेल त्याला तो नंबर दिला जातो.
कोट..
आकर्षक नंबरसाठी सर्वात कमी दोन हजार रुपये तर सर्वात जास्त साडेचार लाख रुपये महसूल मिळाला आहे. एका वाहनाच्या सीरिजमध्ये क्रमांक शिल्लक नसला तरी दुसऱ्या वाहनातून घेता येतो मात्र त्याला तीन पट रक्कम भरावी लागते. दोन वर्षात सव्वा सहा कोटी रुपये महसूल निव्वळ पसंती क्रमांकातून मिळाला आहे.
- विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
सातारा
या तीन नंबरला सर्वाधिक रेट
००१ : साडेचार लाख रुपये
७७७७ : तीन लाख रुपये
९९९९ : दोन लाख रुपये
या तीन नंबरला सर्वाधिक मागणी
१
११११
९९९९
आरटीओची कमाई
२०१९ : ३,०९९,३३,५०४
२०२० : २.२६,१२०००
कोरोना काळातही हौसेला मोल नाही
कोरोना काळात लॉकडाऊन असूनदेखील गाडी खरेदी केल्यानंतर तिला आकर्षक नंबर घेण्यावर भर दिला. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये वीस लाख रुपये मिळाले आहेत.
२०१९ मध्ये ४ हजार १६१ आकर्षक नंबर विकले गेले. तर २०२० मध्ये २ हजार ६०० आकर्षक नंबर विकले गेले आहेत.
गेल्या दोन महिन्यात मात्र थोडीफार घट झाली आहे. परिस्थिती सुधारल्यानंतर सातारकर पुन्हा आकर्षक नंबर खरेदी करण्यासाठी मागे राहणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.