दत्ता यादव ।सातारा : एकीकडे गोरगरिबांना आरोग्य सेवा चांगली मिळावी म्हणून शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे मात्र, रुग्णांना उपचाराविना ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाहायला मिळत आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात होत असताना विनाकारण रुग्णांना थेट ससूनला नेण्याचा सल्ला दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडत आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल २८ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी ससूनला नेण्याचा सल्ला देण्यात आला असल्याचे पुढे आले आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा तालुक्यातील कारी येथील राजेंद्र पवार (वय ५०) यांना हर्नियाचा त्रास होत असल्याने ते जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांचे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आले. मात्र भूलतज्ज्ञांनी त्यांना ‘इथे शस्त्रक्रिया होणार नाही, तुम्हाला ससूनला जावे लागेल,’ असा सल्ला दिला.यावर नातेवाइकांनी त्याचे कारण विचारले असता त्यांना अॅलर्जी असल्याचे सांगण्यात आले. पवार यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे. पुण्याला नेण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. शासकीय रुग्णवाहिका मिळेल, याची खात्री नसल्यामुळे त्यांनी पुन्हा सिव्हिलमधील दुसऱ्या डॉक्टरांना रिपोर्ट दाखविले. त्यावेळी शस्त्रक्रिया विभागामधील डॉक्टरांनी ‘इथे शस्त्रक्रिया करायला काहीच हरकत नाही,’ असा पवार यांच्या नातेवाइकांना आधार देत शस्त्रक्रियेची तयारी दर्शविली. भूलतज्ज्ञांशिवाय पवार यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातच यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली. पवार हे सध्या अतिदक्षता विभागामध्ये दाखल असून, त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. अखेर सिव्हिलमध्येच त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने भूलतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याचे नातेवाइकांनी आश्चर्य व्यक्त केले. ससूनला नेण्याचा सल्ला तोंडे पाहून दिला जात असल्याचा आरोप नातेवाइकांकडून होत आहे. ओळख नसेल तर रुग्णांना ससूनशिवाय पर्याय नसतो. पवार हे प्रातिनिधिक उदाहरण असले तरी अशाप्रकारचे किती रुग्ण ससूनच्या प्रतीक्षेत आहेत, याची माहिती घेतली असता केवळ चार महिन्यांत २८ जणांना ससूनचा सल्ला दिल्याची धक्कादायक महिती समोर आली. या सर्व रुग्णांचे रिपोर्ट व्यवस्थित असतानाही त्यांना ससूनचा सल्ला देण्यात आला आहे. टाळाटाळ अन् रिक्स नको म्हणून हा सारा खटाटोप असल्याचे एका वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले.हर्निया तर अपेंडिक्स पोटदुखी..जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या चार महिन्यांत तब्बल २८ रुग्णांना ससूनला नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये अनेक रुग्ण अपेंडिक्सने तर काही रुग्ण हर्नियाने त्रस्त्र होते. तसेच काहींना पोटाचाही विकार होता. सिव्हिलमध्ये सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांच्या रिपोर्टवर ससूनला नेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सिव्हिलमध्ये शस्त्रक्रिया होण्याचे प्रमाण जास्त आहे. परंतु जेवढे टाळता येईल तेवढे टाळून रुग्णांना पुण्याला पाठविले जाते. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचा नातेवाईकांकडून आरोप होत आहे.‘सिव्हिल’मध्ये चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, अशाप्रकारे जर कोणी रुग्णांना ससूनला जाण्याचा सल्ला देत असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.-डॉ. श्रीकांत भोई (जिल्हा शल्यचिकित्सक)संबंधित रुग्णाला ११ इंजेक्शनची रिअॅक्शन येऊ शकते. त्यामुळे त्यांना ससूनला नेण्याचा सल्ला देण्यात आला होता. ज्यांनी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली आहे. त्यांनी स्वत:च्या रिस्कवर शस्त्रक्रिया केली आहे.-डॉ. रामचंद्र जाधव (भूलतज्ज्ञ)