सातारा : परकीय कर्ज देण्याच्या आमिषाने साताऱ्यातील एका उद्योजकाची तब्बल ८० लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेंगलोर येथील एका व्यक्तीसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.श्रीनिवास सत्यनारायण मधीमधी (रा. बेंगलोर), अजित गायकवाड (रा. वेळे, ता. वाई, सध्या रा. ठाणे) बिलाल अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रसन्न आनंदराव देशमुख (वय ४६, रा. कामाठीपुरा पेठ, सातारा) यांची स्वत:ची कंपनी आहे. मुंबई येथे १२ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कंपनीचे प्रदर्शन आयोजित केले होते.
यावेळी तेथे अजित गायकवाड यांची ओळख झाली. त्यांनी बेंगलोर येथील श्रीनिवासची ओळख करून दिली. ही ओळख करून देताना श्रीनिवास हे परकीय गुंतवणुकीचे आर्थिक कर्ज देण्याच्या क्षेत्रात काम करतात, असे सांगितले. त्यामुळे देशमुख यांचा विश्वास बसला.
संबंधितांनी खोटी कागदपत्रे तयार करून प्रसन्न देशमुख यांच्याकडून ८० लाख रुपये घेतले. ही रक्कम घेताना संबंधितांनी हसीना एन्टरप्राईजेस यांच्या अॅक्सीस बँकेच्या कागदपत्रांसाठी पैसे लाणार आहेत, असे सांगितले होते.त्यामुळे देशमुख यांनी संबंधितांच्या अकाऊंटवर ८० लाख रुपये पाठविले. मात्र, कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.