सातारा : महाराष्ट्र राज्य वेटरन्स आकव्याटिक असोसिएशनच्यावतीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील ११ खेळाडूंनी यश मिळविले.अमरावती येथील शिवाजी स्विमिंग टँकवर २२ वी खुली जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३३ जिल्ह्यांतील संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा जलतरण संघाने इतर जिल्ह्यांच्या संघांवर वर्चस्व सिद्ध करून दबदबा निर्माण केला.
अत्यंत चुरसीच्या स्पर्धेत श्रीमंत गायकवाड (रा. सोनगाव, ता. सातारा) यांनी ४ सुवर्ण, संजय भिलारे (रा. सोमर्डी, ता. जावळी) यांनी ३ सुवर्ण १ रौप्य, सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत साबळे यांनी २ सुवर्ण १ रौप्य, जयसिंग साबळे १ सुवर्ण ३ रौप्य, महसूल सहायक विजय साबळे ३ रौप्य, प्रा. रवींद्र साबळे १ सुवर्ण १ रौप्य, रमेश बोडके, ज्ञानदेव साबळे, नंदकुमार साबळे, संजय इथापे, दिलीप साबळे (सर्व रा. वडूथ, ता. सातारा) यांनी सुवर्ण पदक पटकाविले.सातारा जिल्हा संघाने ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, फ्रीस्टाईल ५०, १००, २००, ४०० मीटर व दोन रिलेमध्ये नेत्रदीपक कामगिरी करून स्पर्धेमध्ये आपला वेगळा ठसा उमटविला. या विजेत्या खेळाडूंची नोव्हेंबरमध्ये सिकंदराबाद तेलंगणा येथे होणाºया आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी खेळाडूंचे तहसीलदार आशा होळकर, पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सुधाकर शानबाग, सतीश कदम, सुधीर चोरगे, भगवान चोरगे, राजन धुमाळ आणि वडूथचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांनी खेळाडूंचे कौतुक केले.