सातारा : सातारा शहरासह जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत आहे. हवामान विभागाने मंगळवारी सातारा शहराचे कमाल तापमान ३७.५, तर किमान तापमान २२.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविले आहे. वातावरणात सतत बदल होत असताना महाबळेश्वर तालुक्याचा पाराही हळूहळू वाढू लागला आहे. मंगळवारी येथील कमाल तापमान ३०.४, तर किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
तरुणांची हुल्लडबाजी
पेट्री : संचारबंदी असतानाही अनेक तरुण सातारा शहराच्या पश्चिमेला असलेल्या कास, बामणोली या पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत. या तरुणांकडून तलाव परिसरात हुल्लडबाजी केली जात आहे. अनेक तरुण सांडव्यावर उभे राहून फोटोसेशन करताना दिसत आहेत. कास मार्गावर दुचाकीवरून स्टंट करतानाही अनेक तरुण नजरेस पडत आहेत.
रस्ता डांबरीकरण
सातारा : पावसाळा सुरू झाल्यापासून सातारा शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. काही महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आलेला राधिका रस्ताही खड्ड्यात गेला होता. तसेच बुधवार नाका ते आकाशवाणी झोपडपट्टी या रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयनीय झाली होती. सातारा पालिकेकडून या रस्त्याचे डांबरीकरण केल्याने वाहनधारकांंमधून समाधान व्यक्त होत आहे.
नियमांचे उल्लंघन
सातारा : संचारबंदी असतानाही साताऱ्यातील बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचे पालन करा असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे; परंतु नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात असून, फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिकेने कारवाई करणे गरजेचे आहे.
खड्ड्यांमुळे दुरवस्था
सातारा : शहरातील कोटेश्वर मंदिर ते मोळाचा ओढा या रस्त्यावर ठिकठिकाणी लहान-मोठे खड्डे पडले असून, खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना नेमका कोणता खड्डा चुकवायचा, असा प्रश्न पडत आहे. शहराला जोडणाऱ्या या प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही. रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.
संरक्षक कठडे गायब
सातारा : सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटातील संरक्षक कठड्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे कठडे पूर्णपणे ढासळले असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. घाट मार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली असताना दुसरीकडे सुरक्षिततेच्यादृष्टीने बांधकाम विभागाची यंत्रणा तोकडी पडत आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची तातडीने डागडुजी करून धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक लावणे गरजेचे बनले आहे.
सर्रास वृक्षतोड
सातारा : सातारा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून वृक्षतोड सुरू आहे. या वृक्षतोडीमुळे किल्ल्यावरील वृक्षसंपदेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रारंभी झाडाच्या ओल्या फांद्या तोडून त्या आहे त्याच जागेवर टाकल्या जातात. फांद्या सुकल्या की काही दिवसांनंतर त्यांची मोळी बांधून नेली जाते. गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ल्यावर हा प्रकार सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्यांवर वन विभागाच्यावतीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
खटाव : खटावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही कुत्री ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांच्या तसेच वाहनधारकांच्या अंगावर धावून जात आहेत. पालिकेने भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.