सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून थंडी कायम असून किमान तापमानही कमी होत चालले आहे. मंगळवारी तर साताऱ्याचा पारा अनेक महिन्यांनंतर ११ अंशांखाली आला. एका दिवसात तीन अंशांनी किमान तापमान उतरल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात गेल्या वर्षी थंडीला वेळेत सुरुवात झाली असली तरी या ऋतूतील तापमानात सतत चढउतार होत आहे. कधी तापमान १२ अंशांपर्यंत खाली येते; तर काही वेळा २०, २१ अंशांच्या वरही जाते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील नागरिक कधी थंडी, तर कधी उकाड्यालाही सामोरे जात आहेत. मागील वर्षी किमान सतत थंडी जाणवत होती. यंदा मात्र तशी स्थिती राहिलेली नाही.
मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील किमान तापमान कधी १५, तर कधी १७ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ते १२ अंशांपर्यंत खाली आले. परत वाढून ते १५ अंशांवर गेले. आता तर पारा १४ अंशांपर्यंत खाली आला आहे. सोमवारी साताऱ्यात १०.०७ किमान तापमान नोंदले गेले. त्यातच जिल्ह्यात थंडगार वारे वाहत आहेत. यामुळे गारठ्यात आणखी वाढ झालेली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठेत सायंकाळच्या सुमारास गर्दी कमी होताना दिसून येत आहे. तसेच शेतीकामांवरही परिणाम झालेला आहे.
चौकट :
साताऱ्यातील किमान तापमान असे :
दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९, ४ फेब्रुवारी १२.०१, ५ फेब्रुवारी १३.०५, दि. ६ व ७ फेब्रुवारी १४.०९, दि. ८ फेब्रुवारी १४ आणि ९ फेब्रुवारी १०.०७.
............................................................