सातारा :
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दोन वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणले. विशेषत:शंभरहून अधिक गुन्हेगारांना त्यांनी मोक्का लावला तर ७० हून अधिक टोळ्यांना त्यांनी तडीपार केले. कोरोना काळातही त्यांनी उत्तमरित्याकाम केल्याने त्यांचा राज्य शासनाकडून गाैरव करण्यात आला होता. पोलीस वसाहतीचे बांधकाम त्यांच्याच प्रयत्नाने सुरू झाले. हे काम आता अंतिम टप्यात आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांना त्यांच्या वाढदिवसाला सुटी देण्याची प्रथा सुरू केली होती. ही परंपरा त्यांनी कायम ठेवली होती.
दरम्यान, साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले समीर शेख हे यापूर्वी साताऱ्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांना साताऱ्यात काम करण्याचा चांगला अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये सुरूचीवर राडा झाला होता. या प्रकरणात दोन्ही गटांतील शंभरहून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास त्यावेळी समीर शेख हे स्वत: करत होते. तसेच पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींवर तातडीने कारवार्इ व्हावी, यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. गणेशोत्सव, र्इद, दिवाळी या सणामध्ये जातीय सलोखा राहावा, यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले होते.