सातारा : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने साताऱ्यातील संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी गुरुवारी पाण्याखाली गेली. अंत्यसंस्कारासाठी पर्यायी व्यवस्थाच नसल्याने आता कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकला आहे.
कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांवर साताऱ्यातील कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. जिल्हा प्रशासनाकडून या कामाची जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. पालिकेने या कामी १९ कर्मचाऱ्यांचे पथक नेमले असून, प्रत्येकाला कामाची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांत चार हजारांहून अधिक कोरोना मृतांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही या स्मशानभूमीला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कैलास स्मशानभूमीतील चौदा अग्निकुंड पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे आता कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सातारा शहरात दुसरी स्मशानभूमी नाही. पालिकेकडून विद्युत अथवा गॅस दाहिनीची व्यवस्थाही आजतागायत उपलब्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करायचे कुठे? असा प्रश्न पालिकेपुढे उभा ठाकला आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर संपूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली जाऊन परिस्थिती आणखीन गंभीर बनू शकते.
(चौकट)
प्रशासनाने उपाययोजना करावी
पावसाळा सुरू झाला की कैलास स्मशानभूमी पूर्णत: पाण्याखाली जाते. त्यामुळे कोरोना व नैसर्गिकरित्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न गंभीर होतो. सद्यस्थितीला जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा हाहाकार सुरू आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास कृष्णा व वेण्णा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होऊ शकते व स्मशानभूमी पूर्णत: पाण्याखाली जाऊ शकते. त्यामुळे जिल्हा व पालिका प्रशासनाला कोरोनो मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी लागणार आहे.
फोटो : २२ संगममाहुली स्मशानभूमी
साताऱ्यातील संगममाहुली स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून, कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.