सातारा - जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील आसले गावच्या भुमीपुत्राला लडामध्ये वीरमरण आले. सोमनाथ मांढरे असं या वीर जवानाचं नाव असून लडाखमधील बर्फाच्छादित प्रदेशात प्रतिकुल वातावरणाशी लढताना त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे, ते बेशुद्ध पडले होते, त्यानंतर त्यांना तात्काळ मिल्ट्रीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाई तालुक्यातील आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे यांची शुक्रवार पहाटेपासून येथील प्रदेशात नेमणूक होती. कर्तव्यावर असतानाच ते बेशुद्ध झाले. त्यामुळे, त्यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत, सैन्य दलाकडून वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आसले (ता. वाई) येथील त्यांचे बंधू महेश मांढरे यांना ही दु:खद घटना कळवली. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज पहाटे दिल्लीत पोहोचेल. त्यानंतर, सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात आसलेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, सोमनाथ मांढरे यांच्या निधनामुळे आसले गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मांढरे यांच्या पश्चात पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, अवघ्या दहा महिन्यांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे.