सातारा : सातारा बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षात दुपारी कोणीच नव्हतं... एक ज्येष्ठ नागरिक आत येऊन रिकाम्या खुर्चीवर बसले... तेवढ्यात आलेल्या एका माणसानं आजोबांना उठायला सांगितलं. त्याला आजाेबा म्हणाले ‘मी आमदार आहे, मला मुंबईला जायचंय...’ या उत्तरानं सारेच उडाले. आमदार आणि एसटीनं मुंबईला जाणार? यावर कोणाचाच विश्वास बसेना. अधिकाऱ्यांना बोलावले अन् साऱ्याचा उलगडा झाला. ‘ते होते सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख.’ आमदारांच्या स्पर्शानं साताऱ्याची एसटीही गहिवरली होती.
ही घटना आहे २००८ मधील. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात वीज जोडणी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे एकेदिवशी दुपारी वाहतूक नियंत्रक काही कामानिमित्ताने कक्षाबाहेर गेले होते. त्याचवेळी सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख साताऱ्यातून मुंबईला अधिवेशनासाठी निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते बसस्थानकात आले. पण एसटीला आणखी अवधी होता. त्यामुळे ते वाहतूक नियंत्रण कक्षात आले. तेथे कोणीच नसल्याने रिकामी खुर्ची घेऊन त्यावर बसले. एवढ्यात वायरमन काम करण्यासाठी तेथे आला. त्याला उभे राहण्यासाठी खुर्चीची गरज होती. साध्या वेशभूषेतील आजोबांना पाहून त्यानं ‘आजोबा बाहेर थांबा... ती खुर्ची मला द्या’ असे त्यांना म्हणाला. तेव्हा हे आजोबा शांतपणे म्हणाले, ‘मी आमदार आहे. मुंबईला जायचंय. एसटी लागली की मी जाणार आहे.’
एसटी व्यवस्थापनाने प्रत्येक गाडीत आमदार, खासदारांसाठी जागा आरक्षित ठेवलेली आहे. पण कोणी प्रवास केलेला आठवत नाही. त्यामुळे गणपतराव देशमुख यांना पाहिल्यानंतर वाहतूक नियंत्रकाचाही विश्वास बसेना. त्याचवेळी सहायक वाहतूक अधीक्षक अविनाश कचरे काही कामानिमित्ताने बसस्थानकात आले होते. कचरे यांनी करमाळा, अक्कलकोट, सोलापूर येथे कर्तव्य बजावलेले असल्याने त्यांनी देशमुख यांना ओळखले. त्यांना चहा घेण्यासाठी कार्यालयात येण्याची विनंती केली. तर आमदार देशमुख यांनी प्रांजळपणे चहा नाकारुन ‘मुंबईला तीन वाजता गाडी आहे. गाडी आल्यावर मी जाणार आहे.’ असे सांगितले. त्याप्रमाणे एसटी लागल्यानंतर स्वत:च एसटीत जाऊन बसलेही.
या घटनेला तब्बल तेरा वर्षे झाली. पण त्यानंतर कोणत्याही दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी एसटीतून प्रवास केल्याचे आठवत नाही. आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या जाण्याने अधिकाऱ्यांमध्ये या घटनेला उजाळा मिळाला आहे.
चौकट :
ना जागेसाठी आग्रह...
मुंबईला जाणारी एसटी फलाटावर लागताच आमदार गणपतराव देशमुख एसटीत गेले पण तोपर्यंत अन्य प्रवासी गाडीत बसल्याने देशमुख पाठीमागील रिकाम्या बाकड्यावर जाऊन बसले. हे लक्षात आल्यावर कचरे यांनी तत्कालीन स्थानकप्रमुख शब्बीर शेख यांना सूचना केल्या की, ‘आमदार वयाने ज्येष्ठ आहेत. आमदारांसाठी महामंडळाने जागा राखून ठेवली आहे. त्या ठिकाणी बसलेल्या प्रवाशांना पाठीमागे जाण्यास सांगून त्यांना त्यांची जागा मिळवून द्या.’ त्यानुसार शेख यांनी देशमुख यांना पुढे बसण्यासाठी येण्याची विनंती केली. पण ‘मला येथे जागा मिळालीय, असू द्या..’ असे म्हणत ते आहे त्याच ठिकाणी बसले होते.
कोट :
आता आमदार म्हणून निवडून आल्यानंतर वर्षभरात चारचाकी गाडी येते. सोबत कार्यकर्त्यांचा फौजफाटा असतो. पण आमदार गणपतराव देशमुख यांच्यासोबत पीएही नव्हता. कसलाही बडेजावपणा न करता त्यांनी एसटीतून प्रवास केला. तो एसटीसाठी भाग्याचा दिवस होता.
- अविनाश कचरे,
निवृत्त विभाग नियंत्रक, नांदेड.