सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, सोमवार (दि. १३) व मंगळवारी (दि. १४) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.अर्धा टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या कास धरणात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. मात्र, नागरिकांना उन्हाळा सुसह्य जावा यासाठी पालिकेकडून दोन महिन्यांपासून कास व शहापूर योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात सुरू करण्यात आली आहे. एकीककडे पाणीकपात सुरू असताना दुसरीकडे कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी या जलवाहिनीला पुन्हा एकदा आटाळी, कासाणी गावाजवळ मोठी गळती लागली. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही गळती काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वेळ लागणार असल्याने सोमवारी पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा व कात्रेवाडा टाकीतून सायंकाळ सत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर मंगळवारी यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ, कात्रेवाडा टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी व कोटेश्वर टाकीतून होणारा सकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.
कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती; साताऱ्याचा पाणीपुरवठा सोमवार, मंगळवारी बंद
By सचिन काकडे | Published: May 10, 2024 7:17 PM