जगदीश कोष्टी।सातारा : ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवाची खाण असल्यानं भावी पिढीला उपयोगच व्हायला हवा. पण बदलत्या जीवनपद्धतीमुळे हेच ज्येष्ठ नागरिक अडगळीचे वाटू लागले आहेत. त्यातून कौटुंबिक कलह वाढत असतात. समाजाला भेडसावणाऱ्या जिवंत समस्येवर छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्रा. डॉ. शामला माने यांनी संशोधन केले. अन् त्यातून असे लक्षात आले की साता-यातील बहुतांश ज्येष्ठ नागरिक स्वत:ला गुंतून ठेवत असल्याने ते कुटुंबालाही धरून आहेत. या संशोधनात आलेले अनुभव ‘लोकमत’ वाचकांसाठी...
प्रश्न : ज्येष्ठ नागरिकांवर संशोधन करावे, असे आपणास का वाटले?उत्तर : लहानपणापासून ज्येष्ठांना जवळून पाहत आले आहे. त्याचवेळी समाजात अनेक ज्येष्ठ नागरिक कौटुंबिक, सामाजिक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे उरलं-सुरलं आयुष्यही नीट जगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यास करण्याचा संकल्प केला.
प्रश्न : या विषयावर किती वर्षे संशोधन केले. स्वरूप कसे होते.उत्तर : सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा समाजशास्त्रीय अभ्यास हा विषय संशोधनासाठी घेतला. त्यासाठी २००५ पासून तयारी करत होते. साताºयातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकींना जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रश्नावली भरून घेतली.
प्रश्न : निष्कर्ष काय निघाला?उत्तर : हे संशोधन करताना असा निष्कर्ष निघाला की, साताºयातील ज्येष्ठ नागरिक सुशिक्षित अन् सधन आहेत. त्यामुळे ते ज्येष्ठ नागरिक संघात जातात. विविध सामाजिक उपक्रम, व्याख्याने, सहलींमध्ये गुंतून ठेवतात. त्यांनी स्वत:ला कुटुंबामध्ये सामावून घेतले आहे. त्यामुळे कुटुंबात वादाचे फारसे प्रसंग येत नाहीत. काही ज्येष्ठ नागरिक मुलांपासून वेगळे राहत असले तरी ते त्यांच्या नजरेसमोर आहेत. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष निघाला तो ज्यांच्याकडे पैसा, संपत्ती आहे, त्यांना कुटुंबातून फारसा त्रास होत नाही. तसेच ज्येष्ठांनीही सतत तरुण पिढीच्या राहणीमानाबाबत मतप्रदर्शन करू नये. ज्येष्ठ नागरिक आणि नव्या पिढीने एकमेकांना सामावून घेतले तर कलह टळण्यास मदत होणार आहे.
- संपत्ती स्वत:कडेच ठेवून मृत्यूपत्र करावे
संशोधनातून असे लक्षात आले की, पैसा, संपत्ती ज्या ज्येष्ठांकडे आहे. त्यांना कुटुंबातून फारसा त्रास होत नाही. आजारपण, औषधे, दैनंदिन गरजा, नातवांचे लाड करण्यासाठी कोणाकडे हात पसरावे लागत नाहीत. अगदी झोपून असू तेव्हा सेवा कोणी नाही केली तरी आपण एखादी परिचारिका नेमू शकतो. संपत्तीचा प्रश्न येतो तेव्हा अंतिम निर्णय म्हणून मृत्यूपत्र तयार करून त्याचे नियोजन करावे.
- वृद्धाश्रमात बाहेरचे ज्येष्ठ अधिक
सातारा शहर परिसरात पाच-सहा वृद्धाश्रम आहेत. या वृद्धांश्रमांचाही प्रा. डॉ. शामला माने यांनी अभ्यास केला. यामध्ये असे लक्षात आले की, या ठिकाणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत बाहेर ज्येष्ठ नागरिकांची संख्याच जास्त आहे.