सातारा : सातारकरांनी सरत्या वर्षाला निरोप अन् नवीन वर्षाचे स्वागत उत्साही वातावरणात पण कुटुंबियांसमवेत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अकरानंतर जमावबंदी आदेश लागू केला होता. त्याचे तंतोतंत पालन केल्याने अकरानंतर सर्वत्र सामसूम जाणवत होती. दुसरीकडे महाबळेश्वर, पाचगणी या प्रमुख पर्यटनस्थळी गुरुवारी हजारो पर्यटक दाखल झाले होते. पण तेथेही रात्री लवकरच हॉटेल्स बंद झाली.
सातारकरांच्यादृष्टीने सरते वर्ष २०२० खूप काही शिकवून गेले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. सर्वाधिक परिणाम पर्यटन क्षेत्रावर जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सातारकरांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी रात्री अकरानंतर जमावबंदी आदेश लागू केला होता. त्यामुळे साताऱ्यात रात्री अकरानंतर सर्वच ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. दरवर्षी राजवाडा चौपाटी रात्री उशिरापर्यंत गजबजलेली असायची. यंदा मात्र तेथे कोणीही दिसत नव्हते.
सरत्या वर्षाला निरोप अन् नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये उद्योजक, अभिनेत्यांसह अनेक सिलिब्रेटींनी हजेरी लावली. त्याचबरोबर राज्यभरातून हजारो पर्यटक दाखल झाले होते. बॉम्बे पॉईंटवर सरत्या वर्षातील सूर्याला निरोप देण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये कैद केला.
चौकट :
ढगाळ वातावरणामुळे निराशा
महाबळेश्वरमध्ये मुक्काम केलेल्या पर्यटकांनी शुक्रवारी पहाटेच नवीन वर्षातील पहिल्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. मात्र पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सूर्य उगवतानाचा निसर्गाचा नजारा पाहता आला नाही. त्यामुळे अनेकांची निराशा झाली.