सातारा : सावली आपली साथ कधीच सोडत नाही असे म्हटले जात असले तरी वर्षांतून एकदा का होईना ती आपली साथ सोडत असते. सातारकरांना हा खगोलिय चमत्कार शुक्रवार, दि. १० मे रोजी शुन्य सावली दिनी अनुभवता येणार आहे. या दिवशी आपली सावली काही वेळासाठी गायब होणार असल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.शून्य सावली दिवस म्हणजेच झीरो शॅडो डेमागे खगोलिय व वैज्ञानिक कारण आहे. पृथ्वीवर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात शून्य सावली दिवसाचा अनुभव दरवर्षी घेता येतो. साताऱ्यात शुक्रवारी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार असून, या खगोलिय चमत्काराची नागरिकांसह विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे. हा अनुभव घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत सूर्य निरीक्षण करावे लागणार आहे. नागरिकांना मोकळ्या जागी अथवा इमारतीच्या गच्चीवर एकट्याने अथवा समूहाने या दिवसाचा अनुभव घेता येईल, असे खगोल अभ्यासकांचे म्हणने आहे.
सावली गायब होणार म्हणजे काय?पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडील भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडेच अथवा दक्षिणेकडेच दिसताे. या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्य बरोबरच डोक्यावर आलेला अनुभवयास मिळतो. जेव्हा सूर्य डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा भास होतो. यालाच शून्य सावली दिवस अथवा झिरो शॅडो डे असे म्हणतात.
शून्य सावली दिवस ही एक खगोलिय घटना असून, यामागे विज्ञानही लपले आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना होणारे दक्षिणायन, उत्तरायण, पृथ्वीच्या भ्रमणगतीमुळे होणाऱ्या घडामोडी अशा कित्येक गोष्टींचे आकलन आपल्याला अशा घटनांमधून होत असते. विद्यार्थी व नागरिकांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव जरुर घ्यावा. - प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक