सातारा : पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे काम होईपर्यंत शहरात एकेरी वाहतूक सुरू न करण्याची भूमिका ‘लोकमत’च्या माध्यमातून सातारकरांनी घेतली होती. याला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही हिरवा कंदील दाखविला असून, राजपथावर दुहेरी वाहतुकीच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे आत्तापर्यंत सातारकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे. मात्र, कर्मवीर पथावर एकेरी वाहतुकीचा निर्णय कायम ठेवला.
साताऱ्यात आठ रस्ते एकत्र जोडणाºया पोवई नाक्यावर गेल्या दीड वर्षापासून ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे, त्यामुळे अगोदरच शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असताना पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी सुरू झाली होती. साताºयातील व्यापारी आणि नागरिकांनी एकेरी वाहतुकीला विरोध दर्शविला होता. किमान ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत तरी एकेरी वाहतूक नकोच, असा सूर ‘लोकमत’च्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केला होता. याला जिल्हा पोलीस प्रशासनाने प्रतिसाद देऊन गुरुवारी पोलीस मुख्यालयात तातडीची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत पोवई नाक्यावर सुरू असलेले ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत राजपथावर दुहेरी वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला. तसेच कर्मवीर पथावरील (मोती चौक ते आरके बॅटरी) पर्यंत एकेरी वाहतूक राहणार आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मोती चौकाकडे आरके बॅटरीपासून प्रवेश बंद राहणार आहे. या दोन महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. कर्मवीर पथावर पालिकेकडून ठराविक ठिकाणी हॉकर्स झोन मार्क करून तयार करावेत, पार्किंगसाठी बोर्ड लावून जागा तयार करण्यात याव्यात, अशाही सूचना अधीक्षकांनी यावेळी केल्या.
या बैठकीला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल अहिरे, पालिकेचे दुय्यम अभियंता सुधीर चव्हाण, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी उपस्थित होते.
अद्यापही नाराजीचराजपथावर दुहेरी वाहतुकीच्या निर्णयाचे खरोखरच सातारकरांमधून स्वागत होत आहे. मात्र, कर्मवीर पथावर एकेरी वाहतुकीचा घेतलेल्या निर्णयाबाबत सातारकरांमधून अद्यापही नाराजी आहे. नागरिकांना राजवाड्याकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागणार असल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच आगामी गौरी-गणपती, दसरा, दिवाळी या सणाला कर्मवीर पथावर प्रचंड रहदारी असते. त्यामुळे कर्मवीर पथावरील एकेरी वाहतुकीचा फेरविचार व्हावा, अशी मागणीही सातारकरांमधून होत आहे.
आज पुन्हा बैठकजिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. १२ रोजी साताऱ्यातील एकेरी वाहतुकीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार असून, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. राजपथावर ज्याप्रमाणे दुहेरी वाहतूक सुरू ठेवलीय, त्याचप्रमाणे कर्मवीर पथावरही सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.