सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिराव फुले अन् सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाच्या माध्यमातून साताऱ्याचे नाव जगभर पोहोचविले आहे. या मार्गावरून सातारा जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. चार विद्यापीठांमधील कुलगुरुपद भूषविण्याची कामगिरी सातारा जिल्ह्यातील चौघांनी केली आहे. शिवाजीराव भोसले, देवदत्त दाभोलकर, उत्तमराव भोईटे अन् अशोक भोईटे यांनी नवनवीन प्रयोग केले आहे.रयत शिक्षण संस्था काढून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहोचविली. या संस्थेचे मुख्यालय सातारा शहरात आहे. स्त्री शिकली तर कुुटुंब शिकतं अन् घरादाराची प्रगती होते. हा विचार घेऊन कटगुण येथील जोतिबा फुले यांनी सर्वात प्रथम पत्नी सावित्रीबार्इंना शिक्षणाचे धडे देऊन महिलांसाठी शाळा सुरू केली. त्यामुळे ‘सावित्रीच्या लेकी’ आज विविध क्षेत्रांत देदीप्यमान कामगिरी करत आहेत. या थोर व्यक्तींच्या कार्यामुळे सातारकरांचा उर भरून येतो. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील चौघांनी विविध विद्यापीठांत कुलगुरुपदी कार्य केल्याने सातारकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील डॉ. अशोक भोईटे यांची बुधवारी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी २०१२ ते २०१५ या कालावधीत शिवाजी विद्यापीठात प्र. कुलगुरुपदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. तत्पूर्वी सातारा येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असताना त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.सातारा येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. देवदत्त दाभोलकर यांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची धुरा १९७५ ते ७८ या कालावधीत सांभाळली. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेले कार्य उल्लेखणीय होते. फलटण तालुक्याने यामध्ये बाजी मारली आहे. फलटण तालुक्याने राज्याला दोन कुलगुरू दिले आहेत. मूळचे खटाव तालुक्यातील असलेले; पण फलटणमध्ये स्थायिक झालेले ज्यांनी अमोघ वाणीने अख्ख्या महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविले असे दिवंगत प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले यांनी १९८८ ते ९१ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर याच तालुक्यातील अरडगाव येथील डॉ. उत्तमराव भोईटे यांना १९९५ ते १९९६ या कालावधीत भारती विद्यापीठात कुलगुरुपदी काम करण्याची संधी मिळाले. (प्रतिनिधी)
कुलगुरु पदासाठी सातारचा चौकार!
By admin | Published: February 27, 2015 12:47 AM