सातारा, 4 : निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या सातारकरांची कोजागिरी पौर्णिमा गेल्या अनेक वर्षांपासून यवतेश्वर परिसरात ठरलेली असायची. यंदा घाट बंद असल्यामुळे अनेकांनी कोजागिरी टेरेसवरच करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक वारसा स्थळ असणाºया कास पठाराकडे जाणारा रस्ता यवतेश्वर घाटात खचला. त्यामुळे हा रस्ता पुढील एक महिन्यासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे फुलांचे सौंदर्य बघायला जाणाºयांबरोबरच कोजागिरी पौर्णिमा साजरी करणाºयांचीही अडचण झाली आहे.
सातारा-कास रस्त्यावर साताºयापासून चार किलोमीटर अंतर असणाºया यवतेश्वर घाटात तब्बल चाळीस मीटर लांब व पाच मीटर रुंदीचा रस्ता मधोमध खचला आहे. खोल दरी तयार झाल्याने पर्यटक, वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात दरड कोसळणे, संरक्षक कठडे ढासळणे ही नित्याचीच बाब बनली आहे. या घटनांची यवतेश्वर घाटाबरोबरच नेहमीचे प्रवासी, वाहन चालक व पर्यटकांना सवयच झाली आहे. परंतु, अकस्मात मधोमध रस्ता खचून कोसळणे ही घटना पाहून पर्यटक, वाहनचालक आवाकच झाले.
कास पठारावर फुलांचा हंगाम जोरात सुरू असून, पिवळ्या रंगाचे मिकी माऊस फुलांचे गालिचे दर्शन देऊ लागले आहेत. ऐन फुलांच्या हंगामात अशी घटना घडल्याने पठारावर जाण्याची वाट बिकट वाटू लागली आहे. पंधरा दिवसांनंतर हंगाम संपू शकतो. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरलेली आहे.