सातारा : गेल्या एक वर्षापासून बेकरीला लागणारा मैदा तीस टक्क्याने महाग झाल्याने सातारा शहरातील बेकरी चालकांनी लादीपावच्या दरातही २५ ते ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पावभाजी, वडापाव अन् मिसळपाव आदी खाद्यपदार्थांच्या दरातही लवकरच वाढ होऊ शकत असल्याने सातारकरांना हे पदार्थ तिखट लागू शकणार आहेत. सुमारे साडेचार वर्षांपूर्वी सातारा शहर लादीपाव बेकरी युनियनने २० टक्के दरवाढ केली होती. त्यानंतर नुकतीच युनियनच्या सर्व सभासदांची बैठक होऊन यात मैदा, साखर, तेल अन् डिझेल आदींच्या महागाईचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर २५ रुपयांची रेग्युलर लादी आता ३० रुपये करण्यात आली आहे. तसेच ३० रुपयांची मोठी लादी ४० रुपये होणार आहे. ही दरवाढ शुक्रवार, दि. २० जानेवारीपासून होत आहे, असेही युनियनने म्हटले आहे. मुंबईनंतर वडापावची सर्वाधिक क्रेझ साताऱ्यात असून, लादीपावच्या भाववाढीनंतरही वडापावच्या दरात वाढ होणार नाही, असे अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. मात्र, वडापावचा आकार छोटा होऊ नये, हीच सातारकरांची इच्छा आहे. (प्रतिनिधी)सातारा शहरात जवळपास २२ लादीपाव बनविणाऱ्या बेकरी असून, एका बेकरीत सरासरी ३०० ते ४०० लादीपाव रोज तयार होतात. याचा अर्थ रोज सातारा शहरात नऊ हजार लादीपाव बाजारात हातोहात खपले जातात. विशेष म्हणजे एका लादीत चोवीस पाव असतात. म्हणजे रोज सव्वादोन लाख पाव सातारकर खातात.
सातारकरांना पावभाजी अन् वडापाव लागणार तिखट !
By admin | Published: January 18, 2017 12:12 AM