सातारा : भारत-पाकिस्तान या प्रतिस्पर्धी संघाचा क्रिकेट सामना सकाळी सुरू झाल्यानंतर रस्त्यावर अक्षरश: शुकशुकाट होता. सायंकाळी पाच वाजता भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर साताऱ्यात क्रिकेट शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत, तर शहरातील काही दुकानदारांनी निम्म्या किमतीने ग्राहकांना तांदूळ विकून आनंद साजरा केला.रविवारी सकाळी नऊ वाजता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना सुरू झाला. नेहमी रहदारी असलेल्या रस्त्यावर तसा-तसा शुकशुकाट जाणवू लागला. दुकानेही ग्राहकांंअभावी ओस पडू लागली. दुकानातील कामगार टीव्हीवर सामना पाहण्याचा आनंद लुटत होते. टीव्ही शोरूमध्येही हीच परिस्थिती होती. काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले नागरिकही रस्त्याकडेला असलेल्या दुकानातील टीव्हीवर सुरू असलेला सामना उत्सुकतेने पाहत होते. होते.भारत जिंकल्यास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही दुकानदारांनी हटके योजना आखली. महागडे तांदूळ निम्म्या किमतीने देण्यात येईल, असा दुकानासमोर फलक लावण्यात आला. पाच वाजता भारताने सामना जिंकल्यानंतर तांदूळ घेण्यासाठी दुकानामध्ये नागरिकांची झुंबड उडाली. युवकांनी ठिकठिकाणी पेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजीही करून सामना जिंकल्याचा आनंद साजरा केला. काहीनी पैजाही लावल्या होत्या. ज्यांनी पैज जिंकली, त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)रचना प्रदर्शनातही ‘क्रिकेट फिव्हर’प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी मोठा ‘एलईडी’ लावण्यात आला होता. नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांचीही सोय करण्यात आली होती. प्रदर्शन पाहतच नागरिकांनी क्रिकेटचा आनंद लुटला.
भारताच्या विजयानंतर साताऱ्यात जल्लोष
By admin | Published: February 15, 2015 11:08 PM