सातारा : साताऱ्यांत दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. जिल्ह्याच्या पश्चिम भागासह धरण परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाने धुवाँधार सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, कोयनेत तर दुपटीने आवक होत आहे.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, धरणातील साठा जवळपास दुपटीने वाढून ३३.७० टीएमसीवर पोहोचला आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली. सुरुवातीला काही दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागासह पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.
गेल्या एक महिन्याच्या काळात पावसाने तीनवेळा उघडीप दिली आणि पुन्हा हजेरी लावली. सोमवारी दुपारपासून पश्चिम भागात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. दिवसेंदिवस पावसात वाढ होत चालली आहे.
बुधवारी रात्रीपासून तर पावसाने धुवाँधार बरसण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पश्चिम भागातील ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. भात खाचरात पाणी साठले आहे. त्यामुळे भात लागणीच्या कामाला वेग येणार आहे.गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५२ तर आतापर्यंत १२८५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयनेत गुरुवारी सकाळपर्यंत १४ हजार २९१ क्युसेक पाण्याची आवक झाली होती. ती बुधवारपेक्षा जवळपास दुपटीने आहे. कोयनेत ३३.७० टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.
धोम धरणात ७४८, कण्हेर ९६८, उरमोडी १६९५ तर तारळी धरणात ९३४ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर गेल्या २४ तासांत महाबळेश्वर येथे १३८ तर नवजामध्ये ८२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम २६ (१६७)कोयना १५२ (१२८५)बलकवडी ८६ (४८३)कण्हेर ३१ (१७८)उरमोडी ५० (२३३)तारळी ४९ (३९९)
साताऱ्यात सूर्यदर्शन नाही..
साताऱ्यांत दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. बुधवारी रिमझिम स्वरुपात पडणाऱ्या पावसाने रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. गुरुवारी सकाळपासूनही पावसाचा जोर कायम होता. यामुळे विद्यार्थी, नोकरदारांची तारांबळ उडाली.