नवनाथ जगदाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कदहिवडी : आघाडीत माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या तर विधानसभेला माण हा काँग्रेसला असतो. आघाडीचे काम केले तर पुढे राष्ट्रवादीचा उमेदवार विधानसभेला बंडखोरी करेल मग आपणच का आघाडी धर्म पाळायचा? म्हणून सुरुवातीपासून आमदार गोरे यांनी राष्ट्रवादी विरोधात सर्व पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्तेच्या सारिपाटावर बिघाडीचे राजकारण बघायला मिळत आहे.माढा लोकसभा मतदार संघात माण तालुक्यातील पाच व खटावमधील चार जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे हे काँग्रेसचे आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी हे सर्वच पक्ष चांगली ताकद वाढवत आहे. आमदार गोरे यांचे समर्थक रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी थेट कमळ हाती घेतले. त्यानंतर तालुक्यातील नूर वेगळ्याच वळणावर गेला. राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनी आक्रमक भूमिका घेऊन राष्ट्रवादीने आपल्यावर अन्याय केल्याचा पाढा वाचला. दुसरीकडे आमदार गोरे यांनी प्रत्येक गणात जाऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यामधून संमिश्र भावना ऐकायला मिळाल्या. आता तर शेखर गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची घोषणाच केली आहे.भाजपची धुरा अनिल देसाई सांभाळत असून, राष्ट्रवादी पक्षाची जबाबदारी प्रभाकर देशमुख यांच्यावर आहे. या दोघांनीही आपापल्या उमेदवारासाठी संपर्क दौरे सुरू केले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शेखर गोरे व आमदार गोरे यांनी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना साथ देण्याची भूमिका घेतल्याने माणमध्ये पहिल्यांदाच घड्याळ व कमळ अशी फाईट पाहायला मिळणार आहे.म्हसवड नगरपालिका राष्ट्रवादी तर दहिवडी काँगेसकडे आहे. बाजार समिती काँग्रेस व राष्ट्रवादीकडे असून, खरेदी-विक्री संघ राष्ट्रवादीकडे आहे. असे असले तरी शेखर गोरे यांची ताकद राष्ट्रवादीबरोबर होती. त्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीतील मताची फूट पडणार आहे. तर काँग्रेसची पारंपरिक मते आमदार गोरे यांच्याबरोबर सर्वच जातील, अशी शक्यता दिसत नाही. तरीसुद्धा येणाऱ्या काही दिवसांत तालुक्याचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक माण तालुक्याच्या राजकारणात कलाटणी देणारी असेल. शिवसेना रासप, भाजपबरोबर आहे. त्यांचेही खोलपर्यंत मनोमिलन झालेले दिसत नाही. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी पक्षानेही काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे.माळशिरसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील तळ ठोकून आहेत. त्यांना माणणारे कार्यकर्तेही माण तालुक्यात आहेत. तर दिवंगत सदाशिवराव पोळ यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर असून, खटावमधील गटात मात्र जास्त संदिग्ध भूमिका वाटत नाही. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये होणाºया राजकीय उलथापालथीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.माण तालुक्यात पहिल्यांदाच कमळलोकसभेला या मतदार संघात भाजपला तिकीट मिळाले आहे. विधानसभेला युतीमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण होते. गेल्या निवडणुकीतही भाजपने हा विधानसभा मतदारसंघ रासपला सोडल्याने कपबशीवर लढत झाली होती. खटावमध्ये येळगावकर कमळाच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र माण तालुक्यात पहिल्यांदाच घराघरात कमळ दिसणार आहे.
साताऱ्यात आघाडी; माढ्यात मात्र बिघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 10:53 PM