आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २४ : पुणे-बंगलोर महामार्गावर येथील वाढे (ता. सातारा) चौकात उड्डाणपुलाचे काम काही वर्षांपासून रखडलेले आहे. उड्डाणपुलाच्या पिलरला असणाऱ्या सळया गंजण्याच्या मार्गावर आहेत. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारांनी या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सातारा-लोणंद राज्य मार्ग राष्ट्रीय महामागार्ला वाढे फाटा येथून छेदून पुढे जातो. या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. पंढरपूर-लोणंद-बारामतीच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर वाहनांची नेहमीच मोठी गर्दी असते. उड्डाणपुलाअभावी या चौकात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाहनांची कोंडी तर नित्याचीच असते. वाढे, आरळे, शिवथर, मालगाव या गावांतून साताऱ्यात नित्याच्या कामाला येणाऱ्या वाहनधारकांची तसेच शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या मोठी आहे. या लोकांना जीव मुठीत घेऊनच महामार्ग ओलांडावा लागत आहे. दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून महामार्गाच्या चार पदरीकरणाचे काम झाले, तेव्हा वाढे फाट्यावर उड्डाणपूल करावा, अशी मागणी होत होती; परंतु या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. बॉम्बे रेस्टारंट चौकात एकच उड्डाणपूल तेव्हा बनविण्यात आला. सहा पदरीकरणाच्या कामातही ही चूक राहू शकते, असे प्रसारमाध्यमांनी दाखवून दिल्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग आली. सहा पदरीकरणाच्या कामात वाढे फाट्यावर उड्डाणपूल उभारण्याचे काम घेण्यात आले. मात्र, या पुलाच्या कामाचा भोग अद्याप संपलेला नाही. पुलाचे पिलर्स ठराविक उंचीपर्यंत उभारण्यात आले आहेत; परंतु पुढील काम ठप्प आहे. या पिलर्सचे गज उघडे असून त्यावर गंज चढला आहे. त्यांची देखभालही केली जात नसल्याचे पुढे येत असून काही दिवसांत हे पिलर्स कोसळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पुलाचे काम का रखडले आहे, हा एकच प्रश्न अनेकांना सतावत आहे. याबाबत लोकमतने खोलात जाऊन माहिती घेतली असता महामागार्चे बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा या कंपनीने पुलाच्या उभारणीचे काम पोट ठेकेदाराकडे दिले होते. कंपन्यांतील वादामुळे पहिल्या पोटठेकेदाराने काम सोडले. त्याजागी रिलायन्सने दुसऱ्याच पोट ठेकेदाराकडे हे काम दिले. जितके काम झाले आहे, त्याचे बिल गोलमाल करुन पहिल्या ठेकेदाराला दिले असल्याचे पुढे येत आहे. दुसऱ्या बाजूला वीज कंपनीच्या लाईन शिफ्टिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्याकडेला असणाऱ्या वीजेच्या डीपींना जागा कुठे द्यायची, हा पेच प्रशासनाला अजून सुटलेला नाही. या पेचामुळे उड्डाणपुलाच्या सापळ्याला आकार येईना, असे सध्याचे चित्र आहे. महामार्गावर वाढे चौकात उड्डाणपुलाचे काम रखडल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. शाहूपुरी वाहतूक शाखेचे दोन पोलिस याठिकाणी दिवस-रात्र तैनात असतात. वाहतूक कोंडीची समस्या तसेच अपघात होऊ नये, यासाठी या पोलिसांना रोजच कसरत करावी लागताना पाहायला मिळते. पोलिस नसतील तर वाहनचालकांच्या मारामाऱ्याही होतात.
खेडकरांनी मोठी वाहने न्यायची कशी?
खेड गावात जाण्यासाठी बायपास मार्ग काढला आहे. मात्र त्याची उंची इतकी कमी आहे की त्यातून केवळ चार चाकी वाहनेच जाऊ शकतात. ट्रक, बस अशी मोठी वाहने त्यातून जाऊच शकत नाहीत. खेड येथील स्थानिकांनी घेतलेली वाहनेही त्यांच्या घरापर्यंत कशी नेणार? हा प्रश्न त्यांना पडला आहे.
समस्याच समस्या
- लोखंडी जाळ्यांच्या चोऱ्या- अँगलचे नट काढलेले - भंगार चोरांचा सुळसुळाट- गटारांची अस्वच्छता- गटारावरील झाकणेही चोरीला