सातारा : सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सातारानगरी सज्ज झाली आहे. अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी येणाऱ्या गणेशाच्या स्वागतासाठी साताऱ्यातील बाजारपेठ फुलली आहे. राजवाडा, पोवईनाका, कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रस्ता), खळआळीत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे सोमवारी गणेश चतुर्थीला आगमन होत असले तरी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारीच मूर्ती आपापल्या मंडपात दाखल केली. परगावच्या गणेशमूर्तीही रविवारीच मार्गस्थ करण्यात आल्या. गणरायाच्या स्वागतासाठी सातारानगरी सज्ज झाली असून, भक्तांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता. आदल्या दिवशी रविवारची साप्ताहिक सुटी आल्याने सातारकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. मोती चौक ते पाचशे एक पाटी, खणआळीत गणेशपूजेच्या खरेदीसाठी सायंकाळी गर्दी केली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून ती राधिका रोड मार्गे वळवावी लागली. या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात राजपथ दुहेरी वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी सातारकरांमधून केली जात आहे. साडेचार हजार मंडळांची स्थापना जिल्ह्यात गेल्या वर्षी ३ हजार ८०० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मात्र, यंदा ही संख्या आणखीनच वाढली आहे. ४ हजार ५९७ सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी वाढली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पोलिस आपापल्या नेमून दिलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत. तब्बल अडीच हजार पोलिसांचा गणेशोत्सव संपेपर्यंत वॉच राहणार आहे.
गणरायाच्या स्वागताला सातारानगरी सज्ज!
By admin | Published: September 04, 2016 11:57 PM