सातारा : घरगुती कारणातून सैन्य दलातील जवानाच्या पत्नीने विष प्राशन करून राहत्या घरात शनिवारी रात्री आत्महत्या केली. स्वाती निंबाळकर (वय ३०,रा. कोंडवे, ता. सातारा) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. त्या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती लखन निंबाळकर यांचे दोन वर्षांपूर्वी सैन्य दलात कार्यरत असलेल्या लखन निंबाळकर यांच्यासोबत लग्न झाले होते. त्या मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या तर लखन यांनाही सुटी असल्यामुळे त्या चार दिवस सुटी घेऊन आपल्या सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वांनी जेवण केले. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. यावेळी अचानक स्वाती यांनी विष प्राशन केले. हा प्रकार पती लखन यांच्या निदर्शनास आल्यानंतर स्वाती यांना त्यांनी रात्री अकराच्या सुमारास तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील पोलिसांनी स्वाती यांचा जबाब नोंदविला. ‘टेन्शनमुळे मी विषारी औषध पिले असून, याला कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा जबाब स्वाती यांनी यावेळी पोलिसांकडे दिला. रात्री बारापर्यंत स्वाती यांची प्रकृती चांगली होती. मात्र, साडेबारानंतर अचानक प्रकृती चिंताजनक बनली. मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचार घेत असताना स्वाती यांचा मृत्यू झाला.दरम्यान, स्वाती यांच्या आत्महत्येला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास माहेरच्या नातेवाइकांनी नकार दिला. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर रविवारी दुपारी स्वाती यांच्यावर कोंडवे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.स्वाती यांचे सातारा तालुक्यातील बोरखळ हे माहेर असून, सुमारे चार वर्षांपूर्वी त्या मुंबई पोलीस दलात भरती झाल्या होत्या. स्वाती यांना अकरा महिन्यांचा एक मुलगाही आहे.
साता-यात लष्करातील जवानाच्या पत्नीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2018 1:40 PM