सातारा : घरात सुख:शांती नांदावी, सर्व कार्ये निर्विघ्नपणे पार पडावीत, यासाठी घरात सत्यनारायणाची पूजा घालण्याची प्रथा आहे. पण प्रवाशी आणि रिक्षाचालक यांच्यातील ऋणानुबंध दृढ व्हावेत, यासाठी पोवईनाका येथील आवाज रिक्षा थांब्यावरील चालकांनी गुरुवारी सत्यनारायणाची पूजा बांधली अन् माणुसकीचं दर्शन घडविलं.पोवईनाका येथे तीस वर्षांपूर्वीचा सर्वात जुना रिक्षा थांबा आहे. याठिकाणी जवळपास ४० रिक्षा उभ्या असतात. या व्यवसायातून अनेकांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालतो. ज्याच्यावर आपले पोट अवलंबून आहे, त्या प्रवाशांप्रती स्नेहभाव वाढवा, रिक्षाचालक आणि प्रवाशी यांच्यात आपुलकीचे नाते निर्माण व्हावे, या हेतून याठिकाणी सत्यनारायणाची पूजा घालण्यात आली. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी दरवर्षी ही पूजा होते. या रिक्षा थांब्याजवळ साईबाबांचे मंदिर आहे. ते सर्वांचे श्रद्धास्थान आहे. आदर्श रिक्षा थांबा म्हणून आम्ही नंबरप्रमाणे व्यवसाय करतो. मात्र काही रिक्षाचालक काहीवेळा हा नियम मोडून प्रवाशी वाहतूक करतात. त्यामुळे नुकसान होते. यासाठी याठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली. (प्रतिनिधी)आवाज रिक्षा थांब्यावरील रिक्षाचालकांनी अनेकदा आपल्या रिक्षात प्रवाशांची विसरलेली बॅग परत करून प्रामाणिकपणा दाखविला आहे. बॅगेत असणारे पैसे, दागिने पाहून कधीही येथील रिक्षाचालक मोहाला बळी पडले नाहीत, उलट प्रवाशांकडून मिळणारे बक्षीस ते मंदिराला अर्पण करतात, असे प्रवाशांनी सांगितले.एक हजार केळी, दहा किलो पेढेरिक्षाचालकांनी घातलेल्या सत्यनारायण पूजेसाठी शेकडो प्रवाशी उपस्थित राहिले. सुमारे हजारहून जास्त प्रवाशांनी पूजेचा प्रसाद घेतला. सकाळपासूनच एक हजार केळी, दहा किलो पेढे, दहा किलो पोहे असा प्रसाद प्रवाशांना देण्यात आला. या रिक्षाथांब्यावरून रोज सातशे ते आठशे प्रवाशी प्रवास करतात. अशी माहिती थांब्याचे अध्यक्ष तैमुर शेख व उपाध्यक्ष बाळासाहेब गोरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
रिक्षाचालकांची प्रवाशांसाठी सत्यनारायण पूजा
By admin | Published: January 07, 2016 10:39 PM