सातारा : पुण्यामध्ये बुधवारी रात्री पडलेल्या पावसातील पुरात साताऱ्यातील विवाहितेचा वाहून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली.अमृता आनंद सुदामे (वय २८, रा. मंगळवार पेठ, सातारा, सध्या रा. पुणे) असे वाहून गेलेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी, पुण्यामध्ये बुधवारी रात्री नऊच्या सुमारास अचानक मुसळधार पावसास सुरूवात झाली. कामावरून घरी जाण्याची नागरिकांची लगबग सुरू असतानाच पावसाचा कहर सुरू होता.
पुण्यातील नांदेड सीटीमध्ये राहणाऱ्या साताऱ्यातील अमृता आनंद सुदामे या रात्री दहा वाजता कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघाल्या. धायरी येथील पुलावर त्या पोहोचल्या असता अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह आल्याने त्या दुचाकीसह वाहून गेल्या.
रात्री साडेदहाच्या सुमारास त्या नेहमी घरी पोहोचत असत. परंतु बुधवारी रात्री अकरा वाजल्या तरी त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुटुंबियांच्या मदतीने पोलिसांनी अमृता यांचा शोध घेण्यास सुरूवात केली.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास सनसिटीच्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानात पोलिसांना त्यांचा मृतदेह आढळून आला. अमृता यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे. साताऱ्यातील प्रसिद्ध व दिवंगत वकील विलास देशपांडे यांची अमृता ही मुलगी होती. त्यांच्या मृत्यूमुळे साताऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. अमृता यांचे शिक्षण अनंत न्यू इंग्लिश स्कूल आणि धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात झाले होते. विवाहानंतर त्या पुण्यामध्ये राहण्यास गेल्या होत्या.