सातारा : आधुनिक जगात सर्वांनाच सुरक्षित नोकरी आणि व्यवसाय पाहिजे आहे. त्यामुळे सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शहरात नारळाच्या झाडावर चढणारा माणूस मिळत नसल्यामुळे सातारकरांची पंचाईत झाली आहे. शहरात अनेकांच्या घरासमोर नारळाचे एखादे तरी झाड असतेच. वर्षभर नारळाची सोय आणि फांद्यापासून खराटा तयार होत असल्याने या झाडाचे अस्तित्व आजही घरांच्या आवारात टिकून आहे. काही झाडे तीस-चाळीस वर्षांपासून डौलाने उभी आहेत. उंचच उंच वाढलेल्या या झाडांच्या फांद्या आणि सुकलेले नारळ झाडधारकांच्या डोक्याला ताप ठरू लागले आहेत. येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या जाधव कुटुंबीयांच्या घराशेजारीच एक दवाखाना आहे. अनेक रुग्णांची वर्दळ येथे असते. गत सप्ताहात एका रुग्णाच्या शेजारी हा नारळ पडला. अचानक पडलेल्या या नारळामुळे रुग्ण घाबरला. ही घटना लक्षात घेऊन जाधव कुटुंबीयांनी आपल्या गेटबाहेर एक सूचना फलकच लावला. त्यामुळे आता झाडाशेजारी कोणी उभे राहत नाही. पावसाळ्यानंतर किमान महिनाभर नारळाच्या झाडावर कोणी चढत नाही. त्यामुळे अजून काही दिवस तर जाधवांच्या घराबाहेरील हा फलक असाच झळकत राहणार आहे. (प्रतिनिधी)शेवाळ्याचा अडसरशहरात नारळाच्या झाडावर चढणाऱ्या लोकांची वानवा आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक हे काम करत असल्यामुळे त्यांची वेळ मिळणेही मुश्किल झाले आहे. जे लोक हे काम करतात, त्यांची वेळ एक महिन्यानंतरची मिळते. त्यातही पावसाळ्यानंतर एक महिना हे काम करणारे लोक झाडावर शेवाळं असल्यामुळे वर चढत नाहीत. या सर्व गोष्टींचा विचार करता पुढे आणखी किमान एक महिना तरी सातारकरांच्या डोक्यावरील हे ‘नारळी संकट’ असेच घोंगावणार आहे.
सातारकरांच्या डोक्यावर ‘नारळी संकट’
By admin | Published: October 06, 2014 10:00 PM