सागर गुजरसातारा : साताºयाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपने केलेली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाºया जागेवर उदयनराजेंची वर्णी लागणार असून, त्यापाठोपाठ केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता मिळालेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर मांड ठोकण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. या परिस्थितीत भाजप पिछाडीवर पडल्याचे चित्र पाहायला मिळते. आपली ताकद पुन्हा वाढविण्याची तयारी भाजपने सुरू केलेली आहे.
राज्यसभेचे महाराष्ट्रात एकूण १९ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदार २ एप्रिल २०२० रोजी रिक्त होणार आहेत. यामध्ये शरद पवार, मजिद मेमन (राष्ट्रवादी), अमर साबळे (भाजप), राजकुमार धूत (शिवसेना), हुसेन दलवाई (काँगे्रस), रामदास आठवले (रिपाइं), संजय काकडे (अपक्ष) यांचा निवृत्त होणाºया खासदारांमध्ये समावेश आहे.केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभा सदस्य झाले होते. तसेच भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश आहे. आता त्यांची मुदत २ एप्रिल रोजी संपत आहे. भाजपचे दुसरे खासदार अमर साबळे यांची मुदतही २ एप्रिल रोजी संपणार आहे. या दोन्ही जागांपैकी एका जागेवर माजी खासदार उदयनराजे भोसले यांना नियुक्ती दिली जाण्याची शक्यता आहे. मंत्री रामदास आठवले यांना बाजूला ठेवण्याचे धाडस सध्याच्या परिस्थितीत तर भाजप करू शकत नाही.
राहता राहिली रिक्त होणारी दुसरी अमर साबळे यांची जागा. या जागेवर उदयनराजेंना संधी दिली जाऊ शकते. खासदार किरिट सोमय्या हे देखील राज्यसभेवर निवड होण्यासाठी आग्रही आहेत; परंतु महाराष्ट्रात भाजपची राजकीय ताकद वाढविण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांना उदयनराजेंचे हात बळकट करण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे उदयनराजेंनाच खासदारकीची संधी दिली जाणार, हे निश्चित मानले जाते.