परळी
पांगारे धरणाच्या सांडव्यावरून पाणी.. अनेक ठिकाणी रस्ता खचलेला.. पळसावडे धरणापासून तर रस्ताच वाहून गेलेला. अशा बिकट वाटेतून वाट काढत तहसीलदार आशा होळकर यांनी पांगारे, मोरबाग, बोंडारवाडी या गावांना भेटी देत आपत्ती परिस्थितीची पाहणी करत सांडवली गाव गाठले. गावातील पाणी योजना वाहून गेलेली. गावाच्या डोक्यावर दरड तर गावातून वाहणारा नदीसारखा ओढा चिखल तुडवत आशा होळकर यांनी ग्रामस्थांना एकत्रित करत त्यांना दिलासा देत प्रशासनाची भूमिका समजावून सांगितली. यावेळी सांडवलीचे सरपंच गणेश चव्हाण, बाबूराव कोकरे, पोलीस पाटील रामचंद्र केरेकर उपस्थित होते.
पावसाळा सुरू झाला की, सांडवली, बोंडारवाडी, मोरबाग या गावांच्या अतिवृष्टिमुळे दरडी पडणे, रस्ता वाहून जाणे, शेतीचे नुकसान होणे असे प्रश्न निर्माण होतात. यावर ठोस उपाय म्हणून शासन दरबारी कायम स्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र तोपर्यंत तुम्ही ग्रामस्थांनी जी घरे धोकादायक आहेत. ज्या घरांवर दरडी पडतील, पर्जन्यमानाचा धोका असेल अशा लोकांनी तात्पुरते आपल्या नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची सोय केली पाहिजे. प्रथम आपल्या जीवाला प्राधान्य दिले पाहिजे, असे सांगत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. महिलांनी वर्षांनुवर्षे जगण्या-मरण्याच्या कशा व्यथा सुरू आहेत, हे तहसीलदारांना सांगितले.