आधुनिक पद्धतीने शेती केली आणि कष्ट करण्याची तयारी दाखविली तर काय चमत्कार घडू शकतो, हे फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील युवा शेतकरी मनोज धनाजी भगत यांनी दाखवून दिले आहे. आधुनिकतेची कास धरून मनोज भगत यांनी २० गुंठ्यात फ्लॉवरचे १ लाख २० हजार रुपयांचे उत्पादन मिळविले. हे उत्पन्न केवळ तीनच महिन्यांत घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंप्रद येथील शेतकरी मनोज भगत यांनी ऊस, मका, कांदा, ज्वारी आदी पारंपरिक पिकांचे उत्पादन न घेता अल्प पाण्यावर ठिबकच्या साह्याने ‘पावस’ या जातीच्या फ्लॉवरची १ ते १.५ फूट अंतरावर ५ हजार रोपांची लागण केली. लागणीनंतर २० दिवसांनी शक्तिवर्धकाची आळवणी करून योग्यवेळी पाणी देऊन झाडांची जोपासना केली.रोग प्रतिकारक व योग्य वाढीसाठी १०.२६.२६ १०० किलो, निंबोळी पेंड ४० किलो, बोरॉन १ किलो, सल्फर १० किलो असा वापर केला. तसेच फवारणीतून १९.१९.१९ (पोषक) १ किलो बोरॉन बॉस २५० ग्रॅम यांच्या वापरामुळे पिकास चकाकी आली व वजन वाढण्यास मदत झाली.सध्या बाजारात होलसेल दर १४ ते १५ रुपये किलो दराने फ्लॉवरची विक्री सुरू आहे. आजअखेर ८० हजार रुपयांचा माल विक्री केलेला आहे. तर उर्वरित मालाची तोडणी व विक्री सुरू आहे. मनोज भगत हे उच्च शिक्षित शेतकरी असून, कृषी विभागाचे पदवीधर आहेत. नोकरी न करता शेतीतूनच उत्पादने वेगवेगळ्या पिकांची घेऊन प्रगती साधत आहेत. या कामी त्यांना हेमंत टेंबरे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती मनोज भगत यांनी दिली. ही शेती पाहण्यासाठी तसेच कोणत्या पद्धतीचा वापर केला हे पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी आवर्जून भेट देत असतात.--लखन नाळे
वीस गुंठ्यात सव्वालाखाचा फ्लॉवर
By admin | Published: December 14, 2015 8:36 PM