सातारा : शहरालगत असणाऱ्या एका उपनगरातील दोन युवतींचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सूरज विष्णू लोंढे (रा. प्रतापसिंहनगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला अजूनही अटक करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, सूरज याने पीडित युवतीच्या घरी जाऊन तिच्या चुलत्याला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार युवती आणि तिची मैत्रीण दोघी अभ्यास करत होत्या. अभ्यासाचा कंटाळा आला म्हणून त्या पाय मोकळे करण्यासाठी रस्त्याने चालत निघाल्या होत्या. यावेळी जोराचा पाऊस आल्याने शेजारीच असणाऱ्या पडक्या घरात थांबल्या. यावेळी सूरज विष्णू लोंढे तेथे आला आणि त्याने या दोघींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. यावेळी सूरज याने या दोघींनाही ''मला तुम्हाला विवस्त्र पाहायचे असून त्याचे शुटिंग मी करणार आहे,'' असेही धमकावले. यानंतर या दोघींनी सूरज याला चकवा देत त्याचा मोबाइल घेऊन पडक्या घरातून पळून आल्या. यावेळी त्यांनी जवळच असलेल्या ओढ्यात मोबाइल फेकून दिला. यानंतर दोघीही घरी आल्या. दरम्यान, सूरज यानंतर तक्रारदार युवतीच्या घरी गेला आणि तिच्या चुलत्याकडे मोबाइल मागत शिवीगाळ, दमदाटी केली.
याप्रकरणी पीडित युवतीने तक्रार केल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.