रहिमतपूर : आर्वी, ता. कोरेगाव येथे दैवी अवतार असल्याचा बनाव करून ‘तुमच्या नवऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या आत्म्यापासून मुक्ती देतो,’ असा दावा करीत हुकमुद्दीन उमर मुलाणी (वय ५५) या भोंदूबाबाचा रहिमतपूर पोलिसांच्या मदतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला असून, भोंदूबाबाला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले फिर्यादीच्या पत्नीने आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आर्वी येथील हुकमुद्दीन मुलाणी देवऋषीकडे त्याच्या घरातील दरबारात नेले तिला वाटीतून पाणी प्यायला दिले की तिचे डोके सुन्न व्हायचे व ‘तुला पतीच्या पहिल्या पत्नीचा त्रास होत आहे,’ असे सांगायचा त्यासाठी दहा हजार रुपये घेतले व ‘तुमचा त्रास कमी करतो,’ असे सांगितले. ज्यावेळी अंनिस व पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी हुकमुद्दीन मुलाणी हा गळ्यात कवड्याच्या, काचेच्या मण्याच्या माळा व डोक्याला भरजरी पटका, गळ्यात सोनेरी शाल घालून भांडी, हळद, कुंकू, गुलाल, भस्म बांधलेल्या पुड्या घेऊन डबीवर उदबत्ती पेटवून कौल लावीत बसलेला होता. त्यावेळीस पोलिसांनी ही कारवाई केली.फिर्यादी गणेश दिलीप पांचगे (रा. सातारा) यांनी ‘अंनिस’च्या सातारा शाखेकडे तक्रार केल्यावर ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, शंकर कणसे, अमर माने, केतन जाधव यांनी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेतली. त्यांच्या सूचनेनुसार अंनिस कार्यकर्ते व्हिडिओग्राफर अजित यादव, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे, हवालदार जगदीश कणसे, धनंजय भोसले, सुभाष शिंदे या टीमने सकाळी छापा टाकून भोंदूबाबा त्याच्या साहित्यांसह त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने अनेक भक्तांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.याबाबत अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक यशवंत ढगे, जगदीश कणसे, धनंजय भोसले करीत आहेत. (वार्ताहर)पिंपरी-चिंचवडचेही भक्त दरबारात..भोंदूबाबा हुकमुद्दीन मुलाणीचा पोलीस पर्दाफाश करीत करत असताना तेथील दरबारात पिंपरी चिंचवड, पाटण अशा भागातील १५ ते २० भक्त दरबारात होते. त्यावेळी उदबत्तीच्या साह्याने कौल लावण्याचा प्रकार पोलिसांदेखत चालू होता. त्यामध्ये महिलांचा समावेश जास्त होता. हा कौल कसा खोटा आहे, हे ‘अंनिस’ने यावेळी दाखवून दिल्यानंतर उपस्थितांची भंबेरी उडाली.
म्हणे सवतीच्या आत्म्याला मुक्ती!
By admin | Published: June 11, 2015 10:26 PM