सातारा : 'काका एक फोन कराचाय,' असे म्हणत तरूणीने एका वृद्धाचा फोन घेऊन पलायन केले. ही घटना सातारा बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्याजवळ गुरुवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी अनोळखी तरूणीवर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी यल्लाप्पा चोरगे (वय ७३, रा. सह्याद्री पार्क, गडकर आळी सातारा) हे बसस्थानकात निघाले होते. त्यावेळी एक तरूणी धावत त्यांच्याजवळ आली. काका मला एक फोन करायचा आहे. फोन द्याल का, असे म्हणून तिने त्यांचा फोन घेतला. फोन लावण्याचे नाटक करत तेथून तिने पळ काढला. त्यानंतर रिक्षामध्ये बसून तेथून ती निघून गेली. या प्रकारानंतर शिवाजी चोरगे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. तसेच ज्या रिक्षामधून ती पळून गेली. त्या रिक्षाचाही पोलिस शोध घेत आहेत. सहायक फाैजदार पवार हे अधिक तपास करीत आहेत.
Satara News: काका एक फोन कराचाय म्हणाली, अन् तरुणी मोबाईल घेवूनच पळाली
By दत्ता यादव | Published: May 06, 2023 1:44 PM