आॅनलाईन लोकममसूर (जि. सातारा), दि. २२ :कालगांव ते कवठे रस्त्यावर कालगाव गावानजीक फरशी पुलावर खड्डे पडले आहेत. या पुलावरून दुचाकीस्वारांची मोठी रहदारी असते. सध्या या खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने पुलावरील खड्डे मुजविणे गरजेचे बनले आहे.कालगाव येथील फरशी पुलावर बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजूला नाल्यामध्ये घाण साचून राहीली आहे. परिसरात झाडे-झुडूपे वाढली असल्याने याठिकाणचे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची वेळीच डागडुजी केली असती तर रस्त्याची एवढी दुर्दशा झाली नसती. वेणेगांव, कोपर्डे, तुकाईवाडी, कालगाव, खराडे, कवठे, वडोली भिकेश्वर या गावांसाठी हा रस्ता महत्वपुर्ण आहे. या गावांच्या रहदारीचा विचार करूनच संबंधित रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, रस्ता तयार केल्यापासून बांधकाम विभागाने एकदाही त्याची डागडूजी केलेली नाही. काही वषार्पुर्वी या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होते. त्याचवेळी ते भरून घेतले असते तर पुढे रस्त्याची चाळण झाली नसती.सध्या कालगाव येथे फरशी पुलावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात पाणी साचत असून गढूळ पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे दुचाकीस्वाराचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालगाव-पेरले पुल झाल्यामुळे या मार्गावरून राष्ट्रीय महामार्गावरही जाता येते. परिणामी, या रस्त्यावरून वाहतूकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच आहे. बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पुलावरील खड्ड्यात घोटाळतोय मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 2:33 PM