आॅनलाईन लोकमतवडूज (जि. सातारा), दि. २५ : वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेले नागाचे कुमठे (ता. खटाव) गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण गावाने कंबर कसली आहे. वकील संघटनेबरोबरच वडूजमधील सामाजिक संस्था श्रमदानात सहभागी झालेल्या कुमठेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.भौगोलिकदृष्ट्या कुमठे गावाला डोंगर भागाने वेढले आहे. गावात सर्वसाधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून टंचाई भासायला सुरुवात होते. हा पाणीटंचाईचा कलंक कायमचा पुसण्यासाठी गावकरी श्रमदानासाठी सकाळी लवकरच डोंगराचा रस्ता धरत आहेत. महिला, पुरुष, युवक, युवती, वृद्ध डोंगरावर श्रमदानासाठी जात आहेत. गावापासून डोंगर लांब असल्याने गावातील उपलब्ध असणारी वाहने या कामासाठी धावू लागली आहेत.पंचायत समिती, ग्रामसेवक संघटना आणि गावकऱ्यांसह वकील संघटना, बॉक्सर ग्रुप, प्रयास सामाजिक संस्था यांनी कुमठेत सुमारे दोन तास श्रमदान केले. याशिवाय सामाजिक संस्थेचे सदस्य, नोकरदार, व्यावसायिक, महिला, पुरुष, स्वयंस्फूतीर्ने श्रमदानात सहभागी होत आहेत.भावी पिढ्यांसाठी पाणी प्रश्नाचे कोडे सोडवून टाकण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला असून, श्रमदानातून शोषखड्डे, समतल चरी, डीपसीसीटी, कंटूर बांध, मातीनाला दुरुस्ती, वृक्षारोपण, खड्डे, खोलीकरण व रुंदीकरण या कामांना गावकऱ्यांच्या श्रमदानातून गती मिळाली आहे. (प्रतिनिधी)मुंबई, पुणे, सातारकरांचा मोठा सहभाग कुमठे गावातील काही नागरिक कामानिमित्त, शिक्षण, व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, सातारा व इतर शहरात स्थायिक आहेत. गावच्या पाणीदार चळवळीसाठी वेळ काढून ते श्रमदानासाठी कुमठेत येत आहे. श्रमदानाबरोबर आर्थिक पाठबळही या चळवळीसाठी देण्याचे योगदान यांच्याकडून होत आहे.
टंचाईचा कलंक कायमचा पुसणार...!
By admin | Published: April 25, 2017 1:50 PM