सातारा : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यांना पुढील वर्गामध्ये प्रवेशित करण्यात आले आहे. त्याबाबत अधिक तर पालक, शिक्षणतज्ज्ञांच्या मते, उशिरा का होईना, पण परीक्षा होणे आवश्यक होते. कोरोना असताना शिष्यवृत्तीची परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे इयत्ता पहिली ते नववी, अकरावीच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या घटक चाचण्या, सहामाही परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीद्वारे मूल्यांकन करून त्यांना उत्तीर्ण करीत पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्यात आला. जूनपासून ऑनलाइन, तर डिसेंबरपासून इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण सुरू झाले. यंदा वार्षिक परीक्षा होतील असे विद्यार्थी, पालकांना वाटत होते. मात्र, त्यातच मार्चपासून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने पहिल्यांदा इयत्ता पहिली ते आठवी आणि त्यानंतर इयत्ता नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्यादरम्यान कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करीत एनएमएमएस शिष्यवृत्तीची परीक्षा ऑफलाइन स्वरूपात झाली. त्यापध्दतीने पहिली ते अकरावीपर्यंतच्या परीक्षा घेणे शक्य होते. विनापरीक्षा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे त्यांच्या शैक्षणिक भविष्याच्यादृष्टीने अयोग्य असल्याचे मत पालक, शिक्षणतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे.
परीक्षेबाबत तज्ज्ञ काय म्हणतात?
कोरोनाबाबतची सद्य:स्थिती पाहता, त्यातून मार्ग काढण्यासाठी शासनाने निर्णय घेतला. कोरोनामुळे विविध क्षेत्रांमध्ये बदल झाले आहेत. ते लक्षात घेऊन शिक्षण, मूल्यमापन पध्दतीमध्ये आपण बदल करणे आवश्यक आहे.
- शोएब कच्छी, सातारा
परीक्षा टाळणे हा पर्याय बरोबर नाही. ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेता आली असती. भविष्याचा विचार करता, परीक्षा, मूल्यमापन पध्दतीत बदल करणे गरजेचे आहे. अंतर्गत सातत्यपूर्ण आणि समग्र पध्दतीचा परीक्षा, मूल्यमापनामध्ये समावेश करावा.
- रोहन गुजर, एसईएमएस, सातारा
विद्यार्थ्यांना अभ्यास किती समजला याचे मूल्यमापन करण्याचे साधन हे परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा रद्दचा निर्णय योग्य वाटत नाही. उशिरा का होईना, पण, परीक्षा होणे आवश्यक होते.
- राजेंद्र चोरगे, गुरुकुल स्कूल, सातारा
पालक काय म्हणतात?
परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करणे योग्य वाटत नाही. निवडणुका, शिष्यवृत्तीच्या परीक्षा होतात. मग, ऑफलाइन नाही निदान ऑनलाइन, तरी विद्यार्थ्यांची परीक्षा घेता आली असती. सलग दोन वर्षे परीक्षा पुढे गेल्याने त्याचा विद्यार्थ्यांना एकप्रकारे फटका बसणार आहे.
-तेजश्री कणसे-जाधव, सदरबझार, सातारा
आपल्या गेल्यावर्षीच्या कोरोनाचा अनुभव होता. दुसरी लाट येण्याची शक्यताही वर्तविली होती. त्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पुढे अडचण आली, तर परीक्षा घेण्यासह मूल्यांकन करण्याच्या दुसऱ्या पध्दतीचा विचार शासनाने करायला हवा होता. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिक्षणापैकी त्याला कितपत आकलन झाले आहे. ते जाणून घेण्यासाठी त्यांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. शासनाने मूल्यांकन, चाचणी घेण्याची पध्दत बदलली पाहिजे.
-विजय मोरे, मंगळवार तळे, सातारा
चौकट
ही ढकलगाडी काय कामाची
परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे हे किती योग्य आहे? सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार नाही. त्यामुळे चुकीचा पायंडा पाडला जात आहे. ऑनलाइन परीक्षा घेण्यात काही हरकत नव्हती. जे विद्यार्थी वर्षभर गैरहजर होते. हे विद्याथी यांचे नुकसान आहे. पहिली ते पाचवी हा शिक्षणाचा पाया आहे. तोच कच्चा राहिला तर मुलं पुढं काय आणि कसं शिकणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे, असे हिंदवी पब्लिक स्कूलचे अमित कुलकर्णी यांनी सांगितले.