सातारा : कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ज्या गावांमध्ये शाळा सुरू करायची आहे, त्या गावात गेल्या एका महिन्यात एकही कोविड रूग्ण आढळून आला नाही पाहिजे, ही अटही घालण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्हीटी दर नियंत्रणात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे टिपणी सादर केली आहे. यावर जिल्हाधिकारी काय निर्णय देतात, शाळा सुरू करण्यासाठी काय निकष देतात, जिल्ह्यातील कोविडमुक्त गावांची एकत्रित माहिती घेण्याबरोबरच मार्गदर्शक सूचना आल्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
चौकट :
समितीच्या परवानगीची प्रतीक्षा
जिल्ह्यात सध्या कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीने परवानगी दिली तर व पालकांनी ना हरकत दिल्यानंतरच शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यात किती गावे कोरोनामुक्त आहेत, याचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मात्र, अद्याप एकाही गावातून शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.
शाळेत पाठविण्याची पालकांना धास्तीच
शासनाने कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार तयारीही सुरू केली आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालक म्हणून ना हरकत देऊन देखील, पण तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असताना त्यांना शाळेत पाठवण्याची आमची मानसिकता नाही. शाळेत जाऊन काही त्रास झालाच तर ही धास्ती मनात कायम असणार आहे.
- प्रविणा फडतरे, पालक, कोरेगाव
कोविडचा धोका अद्यापही शंभर टक्के टळलेला नाही. लहान मुले गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील. कोविडचे समूळ उच्चाटन करेपर्यंत शाळा सुरू करण्याचा घाट घातला आणि त्यात मुले बाधित निघाली तर ते विपरीत संकट ठरेल.
- विकास जाधव, संगमनगर, पालक
कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याचे शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सर्वेक्षण करून ग्रामपंचायत आणि पालकांचे विनाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले की लगेचच आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी आम्ही तयार आहोत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शक सूचना घेण्यात येणार आहेत.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील एकूण शाळा : ३८८१
शासकीय : २६९३
पालिका : ५२
... शाळा तयार
जिल्हा प्रशासनाने गावांमध्ये सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर मगच ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतर पालकांचीही एनओसी असलेल्या गावांमध्ये शाळा सुरू होतील.