पुसेगाव : एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोनाबाधित सापडले होते. त्यामुळे शनिवार, दि. २७ पर्यंत शाळा बंद करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोनाबाधित विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर विश्वास न ठेवता पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत अधिक दक्षता घ्यावी, असे आवाहन संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांनी केले आहे.
याबाबत माहिती अशी की, नेर येथील एका मुलीचे आजोबा कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात कुटुंबातील या शाळेची विद्यार्थिनी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. वास्तविक शाळा सुरू झाल्यापासून शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या विद्यालयातर्फे दररोज सर्व प्रकारची दक्षता घेतली जात होती. तरीही घरातील व्यक्तीद्वारे प्रसार झालेल्या विद्यार्थिनीच्या संपर्कात आलेल्या शाळेतील सहा विद्यार्थी बाधित असल्याचे आढळून आले होते. यामध्ये नेरमधील दोन, तर पुसेगावमधील चार विद्यार्थी असल्याने शाळा त्वरित बंद करण्यात आली असल्याचे मुख्याध्यापिकाने सांगितले.
दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीची सोमवारी बैठक झाली.
त्यात शाळा शनिवारपर्यंत बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुन्हा शाळा व्यवस्थापन समितीची एक ऑनलाइन बैठक घेण्यात येईल. शाळा कधी सुरू होणार ते रविवार, दि. २८ रोजी कळवण्यात येईल. अशी माहिती मुख्याध्यापिक यांनी दिली.