सातारा : सन २००८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावात तत्कालीन सरपंच व सदस्यांनी घराच्या नोंदी रद्द केल्याने मूलभूत सुविधांना मुकावे लागत असल्याने कोंढवली येथील कुंभार समाजाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणात शालेय विद्यार्थ्यांनीही शाळेला रितसर उपोषणासाठी सुट्टीचा अर्ज करून शाळेला दांडी मारत उपोषणाला बसले आहेत. १९९३ मध्ये झालेल्या भूकंपातील भूकंपग्रस्तांचे लिंब येथील कोंढवली वाढीव गावठाणमध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी या भूकंपग्रस्तांना कोंढवली गावाला वर्ग करण्यात आले व त्यांना इंदिरा आवासातील घरकुले बांधून दिली व ग्रामपंचायत कोंढवलीमध्ये घराच्या नोंदी करून घेतल्या. परंतु सन २००८ मध्ये ग्रामसभेमध्ये सरपंच आणि सदस्यांनी या नोंदी रद्द केल्याने मागील आठ वर्षांपासून कुंभार समाज हक्कासाठी लढत असून, अनेक लोकप्रतिनिधींनी देखील फक्त आश्वासने दिली. परंतु प्रश्न काही सुटला नाही. दरम्यान, ग्रामपंचायतीत घराची नोंदी व मूलभूत सुविधांसाठी दोनवेळा उपोषणाला बसूनदेखील शासन दरबारी मागणी मान्य होत नसल्याने आज उपोषणाला ३६ कुटुंबे आली असून, यात शालेय विद्यार्थीहीसहभाग झाले असून यामध्ये अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी) उपोषणासाठी सुटीचा अर्ज रस्ता, पाणी, लाईट मिळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी उपोषणासाठी शिक्षकांना सुट्टी मागितली. त्यावर शिक्षकांनी अर्ज करण्यास सांगितले असते. १६ विद्यार्थ्यांनी मूलभूत सुविधांसाठी उपोषणाला तीन ते चार दिवस सुट्टीचा रितसर अर्ज शिक्षकांकडे दिला आहे. उपोषण म्हणजे खायचं-प्यायचं नाय...शासनाकडून न्याय मागण्यासाठी कुटुंबासमवेत आलेली वैशाली संतोष राजे (वय ९) या तिसरीच्या विद्यार्थिनीला उपोषणाविषयी विचारले असता ती म्हणाली की, उपोषण म्हणजे खायचं-प्यायचं नाही, फक्त बसायचं.
हक्काच्या लढ्यासाठी शाळेला दांडी
By admin | Published: February 15, 2016 11:29 PM