सातारा : लहान मुलांवर लादलेलं हे ओझं घातक ठरू शकतं, याचा वृत्तांत ‘लोकमत’नं सचित्र मांडला अन् जिल्ह्यातील शाळा सतर्क झाल्या. कोवळ्या जिवांवरील ओझं कमी करण्यासाठी शाळांनी विविध पर्याय शोधले असून त्यानुसार रोज दप्तरतपासणी केली जात आहे. पूर्वी प्लास्टिक किंवा कापडी पिशवी हातात घेऊन मुले शाळेत जात होती; परंतु काळानुरूप शिक्षणपद्धतीत झालेला बदल अन् स्पर्धा यामुळे कोवळ्या वयातील मुलांच्या मनावर पालकांच्या अपेक्षांचं ओझं आणि पाठीवर दप्तराचं ओझं वाढत चाललं आहे. सातारा शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन ‘लोकमत’नं विद्यार्थ्याचं आणि त्याच्या दप्तराचं वजन प्रत्यक्ष वजनकाट्यावर करून पाहिलं होतं. त्यामध्ये असे दिसून आले होते की, मुलं आपल्या वजनाच्या एक चतुर्थांश ते एक पंचमांश वजन उचलतात. म्हणजे सरासरी वीस ते बावीस किलो वजन असणारे विद्यार्थी साडेचार ते पाच किलो वजनाचे दप्तर रोज पाठीवर घेऊन शाळेत जात आहेत. यासंदर्भात अस्थिरोगतज्ज्ञांची मतेही जाणून घेतली. कोवळ्या वयातील मुलांच्या पाठीवरील एवढे ओझ्यामुळे मुलांना कुबड येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली होती. याअनुषंगाने जिल्ह्यातील शाळा दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरसावल्या असून विविध पर्याय शोधत आहेत. (लोकमत चमू)रोज तीन विषयांचंच दप्तर द्यापाचवी-सहावीसाठी रोज सहा विषय असतात. त्यातील फक्त तीन दिवसांचेच दप्तर विद्यार्थ्यांनी आणावे, असे नियोजन केले आहे. शिवाय पाटी, पाण्याची बाटली अशा जड वस्तू शाळेत आणण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांसाठी फिल्टरच्या पाण्याची सोय शाळेने केली आहे. शाळेत पोषण आहार दिला जातो. त्यामुळे घरून हलका आहार असणारे डबे आणता येऊ शकतात. भविष्यात जेवणासाठी लागणाऱ्या डिश, चमचे शाळेकडून मिळणार आहेत. दप्तराचे ओझे जास्तीत जास्त करमी करण्यासाठी असे प्रयोग केले आहेत.- एस. एस. देशमुख, शालाप्रमुख, अनंत इंग्लिश स्कूल, साताराएका वहीत दोन विषयदप्तराचा आकार कमी करण्याच्या दृष्टीने मुलांना शंभर पानी वही वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिलीसाठी एका वहीत दोन विषय असतील. तसेच शाळेत करावयाचा गृहपाठ, स्वाध्याय वह्या या शाळा सुटल्यानंतर शाळेत ठेवण्याची व्यवस्था केली आहे. दप्तरात काय-काय असावे याबाबत मुलांना फळ्यावर लिहून माहिती दिली असून रोज दप्तर तपासणी केली जाते.- जयश्री उबाळे, मुख्याध्यापिका, अण्णासाहेब राजेभोसले विद्यालय, सातारावेळापत्रकाप्रमाणे दप्तरदप्तराचे ओझे कमी करण्यासाठी वर्गवार बैठका घेऊन मुलांना सूचना केल्या आहेत. शालेय अभ्यासाचे वेळापत्रक ठरले असून पालकांनी रोज वेळापत्रकाप्रमाणेच दप्तर द्यावे. अतिरिक्त वह्या, पुस्तके देऊ नयेत, याबाबत पालकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. शाळेत रोज शिक्षक विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करत आहेत. - प्रमोद वायदंडे, मुख्याध्यापक, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा.
ओझं हटविण्यासाठी सरसावल्या शाळा !
By admin | Published: June 23, 2015 11:53 PM