पाचगणी : येथील प्री-प्रायमरीच्या चिमुकल्यांनी पाचगणी पोलिस ठाण्यातील अहोरात्र कर्तव्य बजवणाºया आणि समाजाचे रक्षण करणाºया पोलिसदादांना राखी बांधून अनोख्या पध्दतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रक्षाबांधनाचा सण आपण साजरा करतो. यामध्ये बहीण भावाला राखी बांधते व आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन घेते. संपूर्ण समाजाची काळजी घेण्यासाठी अहोरात्र झटणारे व स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहणारे पोलिस बांधव ही आपलेच भाऊ आहेत. आपल्या कुटुंबाचा भाग आहेत, हे लक्षात घेऊन भिलारच्या एँजल किंग प्री-प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका निशीता खांडके यांनी या पोलिस बांधवांना राख्या बांधण्याचा अनोखा उपक्रम राबविला.
या उपक्रमाला पाचगणीच्या पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी लगेच होकार दर्शविला. त्यानंतर ठाण्यातच हा रक्षा बंधनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी पोलिस ठाण्याच्या वतीने चिमुकल्या विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका खांडके यांनी पोलिस निरीक्षक सोनवणे यांना पुस्तके भेट दिली.
या कार्यक्रमाला शिक्षिका वनिता तिडके, कविता शिंदे, प्रियांका कांबळे, पोलिस ठाण्यातील कर्मचारी भरत जाधव, अरविंद माने, व्ही. एस. फरांदे, एन. आर. कुलकर्णी, माधुरी दिक्षीत, ए. के. घनवट, जे. एम. काळे आदी उपस्थित होते.