कऱ्हाड : रेठरे खुर्द येथे ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना घडली. मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी जात असताना येथील बिरोबा मंदिरासमोर ऊसाचे वाडे भरून आलेल्या ट्रॅक्टर, ट्राॅलीने मुलीला धडक दिली. या अपघातात ती मुलगी जागीच ठार झाली असून, हा अपघात शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास झाला.
याबाबतची फिर्याद मयत मुलीचा भाऊ अविनाश आकाराम मोहिते (रेठरे खुर्द, ता. कऱ्हाड) यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. नम्रता आकाराम मोहिते (वय १४) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक मोहन गणपती घोडके (रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार नम्रता ही आठवीत शिकत होती. शुक्रवारी सकाळी दहा वाजता ती शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर दुपारी दोन वाजता घरी आली. त्यानंतर मैत्रिणीकडे अभ्यास करण्यासाठी जात असताना वाटेत येथील बिरोबा मंदिरसमोर वाठारकडून रेठरे बुद्रुककडे जाणाऱ्या ट्रॅक्टर (एमएच १० १४३६) व ऊसाच्या वाड्याने भरलेल्या ट्राॅलीने वळण घेताना नम्रता हिला ठोकर दिली.
या अपघाताची माहिती मिळताच अविनाश याने घटनास्थळी येत पाहिले असता बहीण नम्रता ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. ती जागीच मयत झाली होती. यानंतर ट्रॅक्टर व ट्राॅली पाहिली असता, त्यावर ड्रायव्हर मोहन गणपती घोडके (रेठरे बुद्रुक, ता. कऱ्हाड) हा होता. त्यामुळे चालक मोहन घोडके याने रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता, निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून बहीण नम्रता हिला ठोकर दिली. या धडकेत नम्रता हिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, फिर्यादीच्या तक्रारीवरुन ट्रॅक्टर चालक मोहन गणपती घोडके याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.